सिंधूचे स्वप्न भंगले!

सिंधूने धडाकेबाज खेळ करीत पहिली गेम २० मिनिटांत घेतली.

पी.व्ही.सिंधू

उपांत्य फेरीत जपानच्या यामागुचीकडून मात

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे स्वप्नाचा पाठलाग करताना भारताच्या पी.व्ही.सिंधूची उपांत्य फेरीतच दमछाक झाली. जपानच्या अकेनी यामागुची हिने ८० मिनिटे चाललेल्या सामन्यात तिचा १९-२१, २१-१९, २१-१८ असा पराभव केला.

चौथ्या मानांकित सिंधू व द्वितीय मानांकित यामागुची यांच्यातील सामन्याविषयी खूप उत्सुकता निर्माण झाली होती. सिंधूने धडाकेबाज खेळ करीत पहिली गेम २० मिनिटांत घेतली. वेगवान स्मॅशिंग करीत तिने ६-० अशी आघाडी घेतली. यामागुची हिने तिला चिवट लढत देण्याचा प्रयत्न केला. तथापि तिने आघाडी कायम ठेवण्यात यश मिळविले. तरीही ११-१७ अशा पिछाडीवरुन यामागुची हिने १७-१७ अशी बरोबरी केली. तिने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा सिंधूला मिळाला. तिने हा गेम घेत शानदार सुरुवात केली.

यामागुची जिगरबाज खेळाडू आहे. तिने दुसऱ्या गेममध्ये ५-५ अशा बरोबरीनंतर खेळावर नियंत्रण मिळविले. तिने १२-९, १८-१४ अशी आघाडी वाढविली. सिंधूला परतीच्या फटक्यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिला पिछाडी भरुन काढता आली नाही. ही गेम तिने गमावली. २६ मिनिटांच्या या गेममध्ये यामागुची हिने सिंधूच्या कॉर्नरजवळ सुरेख प्लेसिंग केले.

तिसऱ्या गेममध्ये पुन्हा चुरस पाहावयास मिळाली. ४-३ अशा आघाडीनंतर सिंधूने आक्रमक फटक्यांचा उपयोग करीत ११-७ अशी आघाडी मिळविली. यामागुची हिने केलेल्या चुकांचाही तिला फायदा झाला. सिंधूकडे १३-७ अशी भक्कम आघाडी होती. त्या वेळी ही गेम सहज घेत ती सामना जिंकेल अशी अपेक्षा होती. मात्र यामागुची हिने जिद्दीने खेळ करीत तिला झुंजविले. तिने १४-१४ अशी बरोबरी साधली. तेथून रंगतदार झालेली हा गेम २१-१८ असा घेत यामागुची हिने सामनाही जिंकला

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pv sindhu loses to akane yamaguchi in semis of all england open