पुरुषांच्या पाठोपाठ महिला गटातही भारताच्या आशा संपुष्टात

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्ध अवघ्या ३७ मिनिटांत पराभव पत्करल्याने तिला सलग दुसऱ्या स्पर्धेत उपांत्य फेरीतच पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडावे लागले. ओकुहाराने अवघ्या दोन गेममध्ये सिंधूला २१-७, २१-११ असे चकित केले.

सिंधू आणि ओकुहारा यांच्यातील आतापर्यंत झालेल्या लढतींमधील विजयाचे समीकरण ७-६ असे होते. तसेच यापूर्वीच्या दोन लढतींमध्ये सिंधूने ओकुहाराला पराभूत केले होते. त्यामुळे ही लढतदेखील अत्यंत तुल्यबळ होईल, अशी अपेक्षा होती. यापूर्वी दोघी २०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळल्या होत्या. तब्बल ११० मिनिटे चाललेला तो सामना हा महिला बॅडमिंटनच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ  सामन्यांपैकी एक गणला जातो, इतका अप्रतिम रंगला होता. मात्र या सामन्यात ओकुहाराने सिंधूला यत्किंचितही संधी न देता संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले.

सामन्याच्या प्रारंभापासूनच सिंधू मागे पडल्यानंतर तिने पहिल्या गेममध्ये ४-४ अशी बरोबरी गाठली. त्यानंतर ओकुहाराने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेत मध्यंतराला ११-५ तर त्यानंतर पहिला गेम २१-७ असा नावावर केला. दुसऱ्या गेममध्येदेखील सिंधूने टाळता येण्याजोग्या चुकांची पुनरावृत्ती करणे सुरूच ठेवले. त्यामुळे दुसरा गेमदेखील २१-११ असा गमावत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेप्रमाणे पुन्हा उपांत्य फेरीतच गारद झाल्याने सिंधूचे चाहते निराश झाले.

ओकुहाराची तायशी झुंज

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या तैपेईच्या ताय त्झु यिंगने जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. ५७ मिनिटे रंगलेल्या सामन्यात तायने यामागुचीला १५-२१,२४-२२,२१-१९ असे पराभूत केले. त्यामुळे आता अंतिम सामन्यात ओकुहारा आणि ताय यांच्यात विजेतेपदासाठी झुंज रंगणार आहे.