भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप परतली आहे. इंग्लंडमध्ये आयोजित ऑल इंग्लंड बॅडमिंटन या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ती निघाली होती मात्र दुबईत असताना परिस्थिती चिघळल्याने ती तिथेच अडकली. शनिवार संध्याकाळपासून सिंधू दुबईतच अडकली होती.

सिंधूने मायदेशी परतल्यानंतर लिहिलं, ‘बंगळुरूला सुखरुप पोहोचले. गेले काही दिवस अत्यंत अस्थिर आणि भयंकर असे होते. दुबई विमानतळावरील ग्राऊंडस्टाफ, दुबई शहरातील प्रशासन यंत्रणा, विमानतळ कर्मचारी, इमिग्रेशन विभागाचे कर्मचारी आणि आम्हाला मदत करणाऱ्या प्रत्येकाची मी ऋणी आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत तुम्ही आमची सर्वतोपरी काळजी घेतलीत. तुम्ही दाखवलेली तत्परता, काळजी आणि व्यासायिकता कधीच विसरता येणार नाही. तुम्ही जे केलं ते शब्दातीत आहे. आता काही दिवस विश्रांती घेईन आणि पुढचं वेळापत्रक आखेन’.

ऑल इंग्लंड ही बॅडमिंटन विश्वातली अत्यंत मानाची स्पर्धा समजली जाते. १८९९ पासून आयोजित होणाऱ्या या स्पर्धेचं जेतेपद पटकावणं खडतर मानलं जातं. १९८० साली प्रकाश पदुकोण यांनी या स्पर्धेचं जेतेपद पटकावत इतिहास घडवला. २०११ मध्ये पुलेला गोपीचंद यांनी पदुकोण यांचा कित्ता गिरवत जेतेपदावर नाव कोरलं. सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू या दोघी अनेक वर्ष या स्पर्धेत सहभागी झाल्या मात्र जेतेपदाने त्यांना हुलकावणी दिली आहे. दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या सिंधूला या स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरायचं आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेत युद्धामुळे तिला स्पर्धेत खेळता येण्याविषयीच साशंकता निर्माण झाली आहे.

ऑल इंग्लंड स्पर्धा ३ ते ८ मार्च या कालावधीत होणार आहे. मात्र सिंधू तिच्या टीमसह दुबईतच अडकली होती. विमानतळ यंत्रणांनी त्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था केल्याचं तिने म्हटलं आहे.सिंधूची पहिली लढत थायलंडच्या सुपानिंदा काथेआंगशी होणार होती. दरम्यान आम्ही परिस्थितीचं रिअल टाईम अवलोकन करत आहोत असं जागतिक बॅडमिंटन संघटनेनं म्हटलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणार असलेले अन्य खेळाडू सिंगापूर आणि आफ्रिकेमार्गे बर्मिंगहॅम इथे पोहोचले आहेत. परिस्थिती गंभीर आहे. आपात्कालीन परिस्थितीत खेळाडूंना सुरक्षितपणे बर्मिंगहॅम इथे पोहोचता यावं यासाठी आम्ही संबंधित यंत्रणांच्या संपर्कात आहोत.

भारताचे लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी हे बर्मिंगहॅम इथे दाखल झाले आहेत. मालविका बनसोड महिला एकेरीत खेळताना दिसणार आहे. उन्नती हुडाचं विमान रद्द झालं. तिला आफ्रिकेमार्गे बर्मिंगहॅम गाठावं लागलं. जेटलॅगला बाजूला सारत तिला पहिला सामना खेळावा लागणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विकसैराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीत खेळणार आहेत. ध्रुव कपिला आणि तनिशा क्रॅस्टो मिश्र प्रकारात सहभागी होतील.

सिंधूने मांडली होती तिची व्यथा

काही तासांपूर्वी आम्ही विमानतळावर ज्या ठिकाणी लपलो होतो, त्याच्या जवळच एक स्फोट झाला. माझे प्रशिक्षक धूर आणि ढिगाऱ्याच्या अगदी जवळ असल्याने त्यांना त्या भागातून तातडीने बाहेर पडावे लागले. तो आमच्या सर्वांसाठी अत्यंत तणावपूर्ण आणि भयावह क्षण होता.

“आशावादी राहण्याचा प्रयत्न करत आहोत”

ती पुढे म्हणाली, दुबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही सर्वजण आता सुरक्षित आहोत आणि आम्हाला अधिक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सतत मदत केल्याबद्दल दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाचे विशेष आभार. सध्या परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत असताना आम्ही थोडी विश्रांती घेण्याचा आणि आशावादी राहण्याचा प्रयत्न करत आहोत.

दुबई विमानतळावर हल्ला

अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या इराणवरील संयुक्त कारवाईनंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिका व इस्त्रायलच्या कारवाईनंतर इराणने आखाती देशांतील अमेरिकेचे मित्रदेश तसेच तेथील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री झालेल्या इराणी हल्ल्यांत दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच शेजारील ऐतिहासिक बुर्ज अल अरब हॉटेलचे नुकसान झाले आहे. तसेच बुर्ज खलिफा परिसरालाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. रविवारी पहाटे अमिरातीच्या मीडिया ऑफिसने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावरील घटनेत चार जण जखमी झाले आहेत.

‘हा क्षण समजून घेणे कठीण’

“सध्या काय घडत आहे, हे समजून घेणे कठीण आहे. सर्व काही किती वेगाने वाढले आहे, हे पाहणे खरोखरच भयावह आहे. इतके त्रासदायक व्हिडिओ समोर येत आहेत आणि दुर्दैवाने जे घडत आहे, तीच त्याची वास्तविकता आहे. दुबई हे माझे खूप आवडते शहर आहे, जिथे नेहमी सुरक्षित वाटते. त्यामुळे हा क्षण स्वीकारणे आणखी कठीण होत आहे.”

विमानतळावर होता गोंधळ

“मी माझ्या टीमसह दुबईमध्ये अडकलो आहे आणि इराणसोबतच्या संघर्षाभोवतीची परिस्थिती बदलत असताना आम्ही सुरक्षित आहोत. विमानतळावर मोठा गोंधळ आहे. अनेक कुटुंबे अडकली असून ते सर्वजण प्रतीक्षा करत आहेत. आपण सर्वजण लवकरच यातून बाहेर पडू, अशी आशा आहे. असे क्षण आपल्याला आठवण करून देतात की सामान्य आयुष्य किती नाजूक असते. प्रभावित झालेल्या प्रत्येकासाठी सुरक्षितता आणि शांततेसाठी मी प्रार्थना करत आहे.”