PV Sindhu Special Post for Virat Kohli: भारताची डबल ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने किंग कोहलीसाठी खास पोस्ट केली आहे. सिंधूने नुकतीच बंगळुरूमध्ये आयोजित आरसीबी इनोव्हेशन लॅबच्या इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये विराट कोहलीची भेट घेतली. विराटची भेट घेतल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या खास सल्ल्याबद्दल तिने या पोस्टमध्ये खुलासा केला. भारतीय क्रीडा विश्वातील एक मोठं आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सिंधूने विराटचं कौतुक केलं. त्याचा साधेपणा, नम्र स्वभाव आणि इतर खेळाडूंना प्रेरणा देण्याची वृत्ती विशेष असल्याचंही ती म्हणाली.
पीव्ही सिंधू आणि विराट कोहलीच्या बंगळुरूमधील कार्यक्रमापूर्वीच्या भेटीचे फोटो पाहायला मिळत आहेत. आरसीबीने सोशल मीडियावर अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. विराटने भेटल्यानंतर आधी हा मिळवत तिच्याशी काही वेळ गप्पा मारल्या.
विराट कोहलीने पीव्ही सिंधूला काय सल्ला दिला?
विराट कोहलीसोबतच्या भेटीनंतर सिंधूने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने भावुक असं कॅप्शन लिहिलं आहे. “जेव्हा-जेव्हा मला मार्गदर्शनाची गरज भासली, तेव्हा तू नेहमी योग्य सल्ला आणि पाठिंबा देत माझ्यासोबत उभा राहिलास. भारतीय क्रीडा विश्वात खऱ्या अर्थाने ‘सीनियर’ कसं असावं, याचं तुक्ष्यापेक्षा उत्तम उदाहरण असू शकत नाही, उदार, विनम्र, प्रेरणादायी आणि कायम इतरांना पुढे नेण्यासाठी तयार असणारा. पीव्ही, कधीही मागे हटू नकोस,’ तुझा हा सल्ला कायम लक्षात ठेवेन,” असं पीव्हीने या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
अखेरीस तिने एक वाक्य लिहित विराटचं पुन्हा कौतुक केलं, तू जसा आहेस तसाच कायम राहा. “तुझ्यासारख्या व्यक्तींमुळे भारतीय क्रीडा विश्व अधिक समृद्ध आणि सुंदर आहे,” असं अखेरीस सिंधू म्हणाली.
पीव्ही सिंधूसाठी चढ-उतारांचा काळ
सिंधूसाठी गेले काही महिने फार चढउतारांनी भरलेले ठरले. २०२५ च्या उत्तरार्धात दुखापतींमुळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, पुनरागमनानंतर सिंधूने आशादायक कामगिरी करत पुन्हा आपली छाप पाडली. २०२५ बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या वांग झियीला धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. हा तिच्या पुनरागमनातील सर्वात उल्लेखनीय क्षणांपैकी एक ठरला.
तसेच, चीन मास्टर्स स्पर्धेत तिने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगविरुद्ध शानदार विजय मिळवत आपला आत्मविश्वास पुन्हा मिळवल्याचे संकेत दिले. मात्र सिंधूसाठी २०२६ हे वर्ष अधिक आव्हानात्मक ठरत आहे. मलेशिया ओपनमध्ये तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती, पण त्यानंतर तिला सरळ गेममध्ये पराभव स्वीकारावा लागला. तसेच, बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमधून ती राऊंड ऑफ-१६ फेरीतून बाद झाली. या स्पर्धेत तिला चीनच्या वांग झियीकडून पराभवाचा सामना करावा लागला.
