भारताची आघाडीची महिला बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने आगामी उबर चषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी कारण देत यंदा आपण स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नसल्याचं सिंधू बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाला कळवलं आहे. डेन्मार्कमधील आरहस शहरात ३ ते ११ ऑक्टोबर दरम्यान उबर चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. “काही खासगी कारणं आहेत. आमच्या घरात काही कार्यक्रमक आहेत आणि पूजा आहे. त्यामुळे यंदा सिंधू खेळू शकणार नाही.” सिंधूचे वडील पी.व्ही.रमण यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना माहिती दिली.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस डेन्मार्क ओपन स्पर्धेतील सहभागावरही सिंधू नंतर निर्णय घेणार असल्याचं रमण यांनी सांगितलं. “घरातली कामं आणि पुजा हे सर्व १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान संपलं तर इतर स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबाबत सिंधू नक्की विचार करेल. कदाचीत तोपर्यंत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येईल अशी अपेक्षा आहे.” डेन्मार्क ओपन आणि इतर दोन आशियाई ओपन स्पर्धांसाठी सिंधूने आपली एंट्री पाठवली असली तरीही स्पर्धेतील सहभागाबद्दल सिंधू नंतर निर्णय घेणार असल्याचं कळतंय. लॉकडाउन पश्चात भारतीय बॅडमिंटनपटूंनी सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे थॉमस चषकासाठी आता कोणत्या भारतीय खेळाडूंची निवड होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.