सिंधूचा कांस्य नजराणा

बॅडमिंटनपटू सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओला नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई करून इतिहास घडवला

जियाओला नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचा रविवारचा नववा दिवस बॅडमिंटनमधील पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकाने आणि पुरुष हॉकी संघाने ४९ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या पराक्रमामुळे भारतासाठी यशस्वी ठरला. बॅडमिंटनपटू सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओला नमवून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकाची कमाई करून इतिहास घडवला, तर हॉकी संघाने ब्रिटनला ३-१ अशा फरकाने नामोहरम केले. वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू, बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहाइन यांच्यानंतर भारताचे हे तिसरे पदक निश्चित झाले. बॉक्सिंगपटू सतीश कुमारने दुखापतीवर मात करीत दिलेली लढत अपयशी ठरली.

पीटीआय, टोक्यो

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत दमदार वाटचाल करणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी अखेर कोटय़वधी भारतीय चाहत्यांना कांस्यपदकाचा नजराणा दिला. जगज्जेत्या सिंधूने कांस्यपदकाच्या लढतीत चीनच्या ही बिंग जियाओला नेस्तनाबूत करून ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला क्रीडापटू ठरण्याचा मान मिळवला.

रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या २६ वर्षीय सिंधूकडून यावेळी सुवर्णपदकाच्या आशा बाळगण्यात येत होत्या. परंतु शनिवारी तिला उपांत्य फेरीत चायनीज तैपईच्या ताय झू-यिंगने पराभूत केले. रविवारी मात्र सिंधूने नव्या उमेदीसह कोर्टवर उतरून सलग दुसऱ्या ऑलिम्पिक पदकावर नाव कोरले. तिने चीनच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या बिंग जियाओचा २१-१३, २१-१५ असा सरळ दोन सेटमध्ये फडशा पाडला. सिंधूचा हा बिंग जियाओविरुद्धचा १६ सामन्यांतील सहावा विजय ठरला.

सिंधू पहिल्या गेमपासूनच लयीत होती. एकवेळ दोन्ही खेळाडूंमध्ये ५-५ अशी बरोबरी असताना सिंधूने खेळ उंचावला. पहिल्या गेम-विश्रांतीप्रसंगी सिंधूने ११-८ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर सलग चार गुण मिळवून तिने जियाओवर दडपण आणले. अखेर सिंधूने २१-१३ अशा फरकाने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये जियाओने कडवा प्रतिकार केला आणि ७-७ अशी बरोबरी साधली. मात्र पुन्हा एकदा सिंधूने अनुभवाच्या बळावर आघाडी वाढवली. पाच मॅच पॉइंट असताना सिंधूने डावखुऱ्या बिंग जियाओला चकवत विजयी गुण मिळवला आणि एकच जल्लोष केला. यावेळी तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. प्रशिक्षक पार्क टाय-संग यांनी उत्साहाने जल्लोष करताना तिला आलिंगन दिले आणि सिंधूच्या या ऐतिहासिक कामगिरीसह ऑलिम्किमधील बॅडमिंटन प्रकारात भारताच्या अभियानाची गोड सांगता झाली.

प्रशिक्षक पार्क यांनी सिंधूला योग्य दिशा दाखवल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. देशातील प्रत्येक नागरिक आज सिंधूच्या नावाचा जयघोष करत होता. काही खेळाडू ऑलिम्पिकमध्ये फक्त देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहतात. मात्र सिंधूने दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करतानाच माझीही मान उंचावली.

– पी. व्ही. रामन, सिंधूचे वडील

सिंधूचा उत्कृष्ट विजय. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन. संपूर्ण भारत तुझी आतुरतेने वाट पाहात आहे.

अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडामंत्री

सलग दुसरे ऑलिम्पिक पदक पटकावल्याबद्दल सिंधूचे हार्दिक अभिनंदन. गेल्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले असून, यामध्ये तिच्या मार्गदर्शक फळीचा तितकाच मोलाचा वाटा आहे. सिंधूने आज कांस्यपदक जिंकले असले, तरी भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात तिचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.

– पुलेला गोपिचंद, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक

सिंधूच्या बचावावर नेहमीच प्रश्न उपस्थित केला जायचा. मात्र यंदा तिने बचावाच्या बळावरच कांस्यपदक जिंकले. सिंधूसह भारतासाठी हे पदक किती अमूल्य आहे, हे मला ठावूक होते. त्यामुळे तिने कांस्यपदक जिंकताच माझेसुद्धा भान हरपले. सिंधूसारख्या दर्जेदार खेळाडूला काय चुकीचे आहे, हे न सांगता, तिने कोणत्या सुधारणा कराव्या, एवढेच प्रशिक्षक म्हणून तुम्हाला सांगावे लागते.

– पार्क टाय-संग, सिंधूचे प्रशिक्षक

२ सिंधू सलग दोन ऑलिम्पिकमध्ये (२०१६, २०२१) वैयक्तिक पदके जिंकणारी भारताची दुसरी क्रीडापटू ठरली. यापूर्वी कुस्तीपटू सुशील कुमारने अनुक्रमे २००८ आणि २०१२मध्ये अशी कामगिरी केली होती.

३ बॅडमिंटनमध्ये (सिंधू २०१६, २०२१ आणि सायना नेहवाल २०१२) भारतीय क्रीडापटूने मिळवलेले हे तिसरे पदक ठरले.

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी हुकल्यामुळे निराश व्हावे की देशासाठी कांस्यपदक जिंकल्यामुळे आनंद साजरा करावा, हा पेच आता माझ्यापुढे आहे. पदकाच्या निर्धारानेच मी टोक्योत दाखल झाली होती. त्यामुळे भारतासाठी कोणत्याही रंगाचे पदक जिंकून मायदेशी माघारी परतणे, हीच माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.

– पी. व्ही. सिंधू

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pv sindhu tokyo olympics 0 0 won medal sports ssh 93

ताज्या बातम्या