scorecardresearch

स्विस खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूला विजेतेपद ; अंतिम फेरीत बुसाननवर मात; पुरुषांत प्रणॉय उपविजेता

अंतिम सामन्यात सिंधूला पहिल्या गेममध्ये ३-० अशी आघाडी मिळाली.

बॅसेल : भारताची दोन ऑलिम्पिक पदकविजेती बॅडिमटनपटू पी. व्ही. सिंधूने रविवारी स्विस खुल्या स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीत भारताच्या एचएस प्रणॉयला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱ्या सिंधूने चौथ्या मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानला २१-१६, २१-८ अशी सरळ गेममध्ये धूळ चारली. या स्पर्धेच्या गेल्या पर्वातील अंतिम सामन्यात सिंधूला स्पेनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मरीनने पराभूत केले होते. यंदा मात्र दुसऱ्या मानांकित सिंधूने खेळ उंचावत जेतेपदाला गवसणी घातली. तिचा बुसाननवरील हा १७ सामन्यांतील १६वा विजय ठरला.

अंतिम सामन्यात सिंधूला पहिल्या गेममध्ये ३-० अशी आघाडी मिळाली. मात्र, बुसाननने पुनरागमन करताना ७-७ अशी बरोबरी साधली. बुसाननने सिंधूला नेटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने बऱ्याच चूकाही केल्या. त्यामुळे पहिल्या गेमच्या मध्यांतराला सिंधूला ११-९ अशी आघाडी मिळाली. यानंतर सिंधूने दमदार खेळ करत पहिला गेम २१-१६ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये सिंधूने अप्रतिम खेळ सुरू ठेवत ५-० अशी आघाडी मिळवली. मग तिने बुसाननला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. अखेर तिने दुसरा गेम २१-८ असा मोठय़ा फरकाने जिंकत या स्पर्धेचे जेतेपद निश्चित केले.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रणॉयला इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित जोनाथन ख्रिस्टीने १२-२१, १८-२१ असे पराभूत केले. ४८ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात प्रणॉयला आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ख्रिस्टीला फारशी झुंज देता आली नाही. २ सिंधूचे हे या वर्षांतील दुसरे जेतेपद ठरले. तिने जानेवारीत सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pv sindhu wins swiss ppen badminton zws

ताज्या बातम्या