पीटीआय, मुंबई
श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सक्षमपणे सांभाळण्यासाठी आवश्यक सर्व गुण असल्याची स्तुती भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांनी केली. तसेच त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने यंदा ‘आयपीएल’मध्ये केलेल्या कामगिरीने शास्त्री प्रभावित झाले आहेत.
‘‘श्रेयसची आक्रमक नेतृत्वशैली पाहिल्यावर तो यंदा पहिल्यांदाच कोलकाताच्या संघाचे कर्णधारपद भूषवत आहे असे वाटत नाही. तो गेल्या तीन-चार वर्षांपासून कोलकाताचा कर्णधार असल्याप्रमाणे वावरतो. त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण दिसत नाही. ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावण्यासाठी आपण आणि आपल्या संघाने कशाप्रकारचे क्रिकेट खेळले पाहिजे, हे त्याला ठाऊक आहे. तसेच आपण फलंदाज म्हणून योगदान देणे महत्त्वाचे असल्याचेही तो जाणतो. तो सामन्यापूर्वी आणि सामन्यानंतरही अगदी स्पष्टपणे बोलतो. त्याचा हा गुणही मला भावतो. कर्णधार म्हणून त्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे,’’ असे शास्त्री यांनी नमूद केले.
कोलकाताने यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या खेळाडू लिलावात श्रेयसला १२.२५ कोटी रुपये देत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. तसेच त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाताने सुरुवातीच्या सहापैकी तीन सामने जिंकले, तर तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्कारावा लागला.