Quinton De Cock on His Fastest Hundred: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका खेळवली जात असून द. आफ्रिका संघाने सुरूवातीचे दोन्ही सामने २-० अशी मजबूत आघाडी मिळवत मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी२० सामन्यात वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सनी पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमी विजयात क्विंटन डी कॉकने त्याच्या टी-२० कारकिर्दीतील सर्वात जलद शतक झळकावलं. पण हे शतक त्याने कोणाच्या बॅटने केलं, याचा खुलासा त्याने सामन्यानंतर केला.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा टी-२० सामना सेंच्युरियन येथे खेळला गेला, जिथे वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ बाद २२१ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर २२२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. एडन मारक्रम व क्विंटन डीकॉकची जोडी सलामीला उतरली, पण मारक्रम लवकर झेलबाद झाला. त्यानंतर क्विंटन डीकॉक व रिकल्टन यांनी दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत नेलं.
क्विंटन डी कॉकने ४९ चेंडूत १० षटकार आणि ६ चौकारांसह ११५ धावा केल्या. २३४.६९ च्या स्ट्राईक रेटने खेळत डी कॉकने ४३ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक होतं. या खेळीदरम्यान, डी कॉकने रिकल्टनसह दुसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागीदारी केली.
क्विंटन डीकॉकने कोणाच्या बॅटने झळकावलं शतक? सामन्यानंतर केला खुलासा
पहिल्या टी-२० सामन्यानंतर सेंच्युरियनकडे प्रवास करताना त्याने एक मोठी चूक केली. सुपरस्पोर्ट पार्ककडे जाण्यासाठी टीम बस निघण्याच्या अवघ्या अर्धा तास आधी त्याला लक्षात आलं की त्याच्या बॅट्स विसरला. डीकॉक याबद्दल सांगताना म्हणाला, “मला हे लक्षात आलं तेव्हा आधी स्वतःचीच थोडी लाज वाटली. गेल्या वर्षभरात माझ्या बॅगा बदलल्या होत्या, त्यामुळे सगळ्या वस्तू तपासत होतो आणि अचानक काहीच आठवेना. कसं काय, माहित नाही… मी विसरलो होतो. बस निघण्याआधी अवघ्या अर्धा तासात एक-दोन फोन करावे लागणार हे लक्षात येताच मी अक्षरशः फिक्का पडलो.”
साहजिकच, किमान दोन तासांच्या विमानप्रवास दूर असलेल्या बॅट्स वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे डी कॉकला दुसऱ्या खेळाडूची बॅट वापरण्याशिवाय पर्याय नव्हता. संघातील वरिष्ठ खेळाडू असल्याने, त्याला निवडीचं स्वातंत्र्यही होतं. डी कॉक म्हणाला, “मी ड्रेसिंग रूममध्ये जाण्याआधी ब्रेव्हिस आणि रिक्स (रायन रिकेल्टन) यांच्या बॅगा पाहिल्या आणि ब्रेव्हिसच्या बॅगेतून एक बॅट उचलली. मी त्याला म्हटलं, ‘आज मी हीच बॅट वापरणार आहे.’ त्यावर ब्रेव्हिस म्हणाला, ‘ठीक आहे, ही तुझ्यासाठी चांगलीच आहे, कारण ही डावखुऱ्या फलंदाजाची बॅट आहे.’ आणि ते ऐकून मी हसलो व म्हणालो, ‘वा! आजकालची पिढी!’”
खरं तर, गोल्फच्या बॅटप्रमाणे बॅट्स काही उजव्या-डावखुऱ्या हातानुसार वेगळ्या बनवल्या जात नाहीत. शिवाय ब्रेव्हिस स्वतः उजव्या हाताचा फलंदाज आहे. तरीही, “तो आपल्या म्हणण्यावर ठाम होता,” असं डी कॉकने हसत सांगितलं. “आणि आज त्याच्या बॅटनं आपलं काम चोख बजावलं,” असं म्हणत त्याने किस्सा संपवला.

