IPL 2026 Quinton de cock record with Hundred: मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सविरूद्धचा सामना गमावला असला तरी या सामन्यात मुंबईसाठी एक गोष्ट चांगली ठरली. ती क्विंटन डीकॉकचं शतक. रोहित शर्माच्या अनुपस्थितीचा मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला असला तरी त्याच्या जागी संघात घेतलेल्या क्विंटन डीकॉकने मात्र शतक झळकावत ११२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. या शतकासह त्याने मोठा विक्रम रचला आहे.
आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्स व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाने डीकॉकवर बोली लावली नव्हती, मुंबईने १ कोटींना संघात घेतलेल्या क्विंटनने मात्र यंदाच्या पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं. मागील चार सामन्यांमधून बाहेर बसलेल्या खेळाडूने आता आयपीएल २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. डी कॉकने अवघ्या ५३ चेंडूंमध्ये सात षटकार आणि सात चौकारांच्या जोरावर आपलं शतक पूर्ण केलं. आयपीएल २०२६ मधील हे डी कॉकचे पहिलं आणि त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील तिसरं शतक आहे. डी कॉकने ६० चेंडूंमध्ये नाबाद ११२ धावा केल्या.
क्विंटन डीकॉकने घडवला इतिहास
क्विंटन डी कॉकने पंजाब किंग्सविरुद्ध शतक झळकावून एक मोठा विक्रमही आपल्या नावे केला आहे. आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांसाठी शतकं झळकावणारा डी कॉक हा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. डी कॉकने दिल्ली डेअरडेव्हिल्स, लखनौ सुपरजायंट्स आणि आता मुंबई इंडियन्सकडून खेळताना शतकं झळकावली आहेत. या हंगामाच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने डी कॉकला १ कोटींच्या मूळ किमतीत खरेदी केलं.
क्विंटन डी कॉकने टी-२० क्रिकेटमधील आपलं नववं शतक झळकावलं आहे. तो टी-२० च्या इतिहासातील सर्वाधिक शतकं करणारा यष्टीरक्षक-फलंदाज आहे. टी-२० शतकांच्या बाबतीत त्याने विराट कोहली, रिले रुसो आणि साहिबजादा फरहान यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
रोहित शर्माच्या दुखापतीमुळे क्विंटन डी कॉकला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. डी कॉकने आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपलं खातं उघडलं. मात्र, त्यानंतर मुंबईने रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव यांच्या विकेट्स गमावल्या. मुंबई अडचणीत सापडली होती, पण नमन धीरच्या साथीने डी कॉकने संघाचा डाव सावरला. नमन धीर आणि डी कॉक यांच्यात शतकी भागीदारी झाली. त्यांनी ६८ चेंडूंमध्ये १२२ धावा जोडल्या. या भागीदारीमुळे मुंबईने २० षटकांत १९५ धावा केल्या, ज्यात नमन धीरने ३१ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.
