Quinto Dekock Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील २४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरला देखील या खेळपट्टीचा चांगलाच अंदाज आहे. त्याने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून रोहित शर्मा नव्हता, त्यामुळे डावाची सुरुवात करण्याची संधी डावखुऱ्या हाताच्या क्विंटन डीकॉकला देण्यात आली. गेल्या ४ सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. रोहित दुखापतीमुळे बाहेर झाल्याने त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात संधीचं सोनं करून दमदार शतक झळकावलं. यासह मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

क्विंटन डीकॉक २०२० नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्स संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला. ज्यावेळी संघाला त्याची गरज होती. त्यावेळी त्याने निर्णायक शतकी खेळी केली. डी कॉकने ५३ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह ६० चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ चौकारांच्या साहाय्याने नाबाद ११२ धावांची खेळी केली. यासह तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्साठी दुसरी सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे.

क्विंटन डी कॉकने या सामन्यात ५३ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. गेल्या ४ सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण संधी मिळताच त्याने शतक झळकावलं. त्याची नाबाद ११२ धावांची खेळी, ही मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. या यादीत सनाथ जयसूर्या अव्वल स्थानी आहे. त्याने २००८ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध खेळताना ११४ धावांची खेळी केली होती. आता ११२ धावांची खेळी करणारा क्विंटन डी कॉक दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने २०१२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध खेळताना १०९ धावांची खेळी केली होती.

मुंबईने केल्या १९५ धावा

मुंबई इंडियन्सला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला होता. रायन रिकल्टन आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर नमन धीर आणि क्विंटन डी कॉकने मिळून डाव सावरला. दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली. डी कॉकने नाबाद ११२ धावा केल्या. तर नमन धीरने ५० धावा केल्या. मुंबईने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९५ धावा केल्या.