Jitesh Sharma Run Out Quinton De Kock: दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज क्विंटन डी कॉकची बॅट चांगलीच तळपली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुल्लानपूर येथे सुरू आहे. या सामन्यात फलंदाजी करताना भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना क्विंटन डीकॉकने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यादरम्यान त्याला शतक झळकावण्याची संधी होती. पण जितेश शर्माने केलेल्या रनआऊटमुळे त्याचं शतक थोडक्यात हुकलं.
क्विंटन डीकॉक सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात तो स्वस्तात माघारी परतला होता. पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन केलं आहे. रीझा हेंड्रिक्ससोबत डावाची सुरूवात करताना दोघांनी ४ षटकात ३८ धावांची भागीदारी केली. पण रीझा हेंड्रिक्स बाज झाल्यानंतर त्याने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याने २५ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतर त्याच्याकडे शतक झळकावण्याची सुवर्णसंधी होती. पण यष्टीमागे असलेल्या जितेश शर्माने वेगाने चेंडू अडवला आणि त्याला रनआऊट केलं.
तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावातील फलंदाजी सुरू असताना भारतीय संघाकडून १६ वे षटक टाकण्यासाठी वरूण चक्रवर्ती गोलंदाजी आला. क्विंटन डीकॉक ९० धावांवर नाबाद होता. शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याने एकेरी दुहेरी धावा घेण्यावर अधिक भर दिला. दरम्यान षटकातील पहिलाच चेंडू वरूणने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. जो टप्पा पडून आणखी बाहेर गेला. या चेंडूवर डीकॉकने थर्ड मॅनच्या दिशेने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची आतल्या भागातील कडा घेऊन यष्टीरक्षण करत असलेल्या जितेश शर्माच्या हातात गेला. जितेशने एका हाताने चेंडू अडवला आणि दुसऱ्या हाताने वेगाने यष्टी उडवली. त्यामुळे डीकॉकला ९० धावांवर माघारी परतावं लागलं.
क्टिंटन डीकॉकचं शतक थोडक्यात हुकलं, पण त्याने अर्धशतक झळकावताच मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. क्विंटन डीकॉक हा भारतीय संघाविरूद्ध खेळताना टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे. या विक्रमात निकोलस पूरन आणि जोस बटलरचा देखील समावेश आहे. पूरनने भारतीय संघाविरूद्ध खेळताना २० डावात ५ अर्धशतकं झळकावली आहेत. तर जोस बटलरने २४ डावात ५ अर्धशतकं झककावली आहेत. दरम्यान डीकॉकने सर्वात जलद १२ डावात ५ अर्धशतकं झळकावली आहेत.
