R Ashwin Captain In ETPL 2026: भारताचा स्टार फिरकी गोलंदाज आर अश्विनने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सध्या तो फ्रँचायझी क्रिकेट खेळताना दिसून येत आहे. युरोपियन टी-२० प्रीमियर लीग स्पर्धेत त्याच्याकडे दुहेरी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत तो डब्लिन गार्डियंस संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आर अश्विनकडे सोपवण्यात आली आहे. यासह त्याची संघाचा मेंटॉर म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या संघाचा संघमालक आहे.
जगभरात अनेक क्रिकेट लीग स्पर्धा खेळवल्या जात आहेत. या स्पर्धांमध्ये आता आणखी एका स्पर्धेची भर पडली आहे. युरोपियन क्रिकेट लीग स्पर्धेची सुरुवात २६ ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघ खेळणार असून, या ६ संघांमध्ये ३२ सामने खेळवले जाणार आहेत.
आर अश्विन हा भारताच्या कसोटी संघातील मुख्य खेळाडू होता. २०२४ मध्ये त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये त्याने आयपीएल स्पर्धेतून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. सध्या तो अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले अनेक खेळाडू युरोपियन टी-२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहेत. ज्यात फाफ डू प्लेसिस, मिचेल मार्श, टिम डेव्हिड आणि स्टीव्ह स्मिथसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
युरोपियन क्रिकेट लीग स्पर्धा ही क्रिकेट आयर्लंड आणि क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन यांच्या पुढाकाराने सुरू झाली आहे. ही युरोपमधील पहिली मल्टी कंट्री फ्रँचायझी क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत आयर्लंड आणि स्कॉटलंडमधील तरुण आणि लोकल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळणार आहे. ज्यात फाफ डू प्लेसिस, हेनरिक क्लासेन, डोनोवन फरेरा आणि एनरिक नॉर्खियासारखे खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
