Ravichandran Ashwin Big Statement Rohit Sharma Virat Kohli: भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अश्विनच्या या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं. भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेनंतर बोलताना अश्विनने संघाच्या कामगिरीसंबंधित अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्याने मालिका १-२ ने गमावावी लागली. यानंतर अश्विन काय म्हणाला, जाणून घेऊया.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. विशेषतः २०२७ च्या वनडे विश्वचषकासाठी या दोघांना भारतीय संघात स्थान मिळेल का, ते अंतिम संघाचा भाग असतील का, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशा परिस्थितीत अश्विनच्या या स्पष्ट वक्तव्याने या चर्चेला नवं वळण मिळालं आहे. “विराट आणि रोहितला संघातून वगळणं अशक्य आहे. सध्या त्यांच्या जागी खेळू शकेल असा दुसरा कोणताही खेळाडू नाही,” असं स्पष्ट मत व्यक्त केलं.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडेपूर्वी रोहित शर्माच्या भविष्याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. काही माध्यमांच्या वृत्तांमध्ये लॉर्ड्सवरील सामना हा रोहितचा भारतासाठीचा अखेरचा सामना ठरू शकतो, असा दावाही करण्यात आला होता. मात्र, या सर्व चर्चांना रोहितने आपल्या फलंदाजीनेच उत्तर दिलं आणि १३८ धावांची दमदार खेळी साकारत टीकाकारांची तोंडं बंद केली. दुसरीकडे, विराट कोहलीनेही ७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत फॉर्ममध्ये पुनरागमनाची झलक दाखवली.

अश्विनने रोहित-विराटला पाठिंबा दर्शवत दोघांच्या जागेला सध्या कोणीही स्पर्श करू शकत नाही, असं तो म्हणाला. तसेच, रोहितवर कोणताही दबाव नव्हता, अशा दाव्यांनाही त्याने फेटाळून लावत, “आग नसताना धूर उठत नाही,” असं सूचक वक्तव्य केलं. अश्विनने यावेळी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या वरिष्ठ गोलंदाजांबद्दलही सहानुभूती व्यक्त केली. फलंदाजांना संघातून वगळलं तर मोठी चर्चा होते, पण वरिष्ठ गोलंदाजांना बाकावर बसवलं तरी त्यावर फारशी प्रतिक्रिया उमटत नाही, असं त्याने सांगितलं.

रोहित -विराटबाबात आर अश्विन नेमकं काय म्हणाला?

“रोहित आणि विराटला खेळायचं असेल, तर त्यांचं स्थान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. कारण त्यांच्याकडे त्यासाठी आवश्यक पात्रता आणि त्यांनी आजवर केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा आहे. त्यांनी सातत्याने धावा केल्या आहेत. ते दोघेही दर्जेदार फलंदाज आहेत आणि त्यामुळे त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही. रोहित शर्माच्या संभाव्य निवृत्तीबाबत ज्या बातम्या समोर आल्या, त्या केवळ मैदानाबाहेरील चर्चा नव्हत्या. आग नसताना धूर निघत नाही. त्यामुळे अशा चर्चांमागे काहीतरी कारण नक्कीच असतं.”

“सिराज, शमी किंवा भुवनेश्वर यांना संघात स्थान मिळालं नाही, तर त्याबद्दल मोजकेच लोक प्रश्न विचारतात. दहा, शंभर किंवा जास्तीत जास्त दहा हजार लोक यावर बोलतील. पण त्यावर मोठा गदारोळ होत नाही. ज्या दिवशी गोलंदाजांसाठीही लोक मोठ्या प्रमाणावर आवाज उठवतील, त्या दिवशी त्यांनाही संघातून वगळणं तितकंच कठीण होईल,” असं अश्विन म्हणाला.

तो पुढे म्हणाला, “विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संघातून वगळणं जवळपास अशक्य आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र, गोलंदाजांच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही.” अश्विनच्या या वक्तव्यातून भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातील फरक अधोरेखित झाला.