R Ashwin On Vaibhav Sooryavanshi: भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा दमदार फॉर्ममध्ये आहे. गेल्या हंगामात गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना त्याने अवघ्या ३५ चेंडूत वेगवान शतक झळकावलं होतं. त्यानंतर अंडर १९ क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. आता आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला आणि अवघ्या १५ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं. काही दिवसांपूर्वीच तो १५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे आता त्याला वरिष्ठ भारतीय संघात स्थान देण्यात यावं अशी मागणी अनेक दिग्गज खेळाडूंकडून केली जाऊ लागली आहे.

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना पहिल्याच सामन्यात त्याने १५ चेंडूत वेगवान अर्धशतक झळकावलं. तर १७ चेंडूत ५२ धावांची खेळी करून तो माघारी परतला. हे फक्त आयपीएलपूर्ती मर्यादित नाही, तर अंडर -१९ क्रिकेटमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. अंडर -१९ वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत त्याने १७५ धावांची खेळी केली होती. पण भारताचा माजी खेळाडू आर अश्विनच्या मते, त्याला इतक्यात भारतीय संघात स्थान द्यायला नको.

वैभव सूर्यवंशीची वादळी अर्धशतकी खेळी पाहून, मोहम्मद कैफ आणि मायकल वॉनसारख्या दिग्गज खेळाडूंनी, त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी केली आहे. पण अश्विनचं मत जरा वेगळं आहे. अश्विन म्हणाला, “वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात स्थान द्या, अशा चर्चा करणं थांबवा. तो अजूनही लहान आहे. जर एमएस धोनी वयाच्या ४५ व्या वर्षांपर्यंत क्रिकेट खेळत असेल तर, वैभवकडे जवळपास २५ वर्षे क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे उगाच घाई करण्यापेक्षा त्याला भारतीय संघाकडून खेळण्यासाठी वाट पाहायला हवी. योग्यवेळी तो भारताकडून खेळताना दिसेल.”

हा दोन्ही संघांचा या हंगामातील पहिलाच सामना होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा डाव अवघ्या १२७ धावांवर आटोपला. चेन्नईकडून जेमी ओव्हरटनने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर यशस्वी जैस्वालने नाबाद ३८ धावा केल्या. यासह राजस्थान रॉयल्सने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला.