R Ashwin Emotional TNPL 2025 Video: रविचंद्रन अश्विन सध्या तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसत आहे. अश्विनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर अश्विन आता टीएनपीएल स्पर्धेत खेळत आहे. या स्पर्धेत अश्विन दिंडीगुल ड्रॅगन्स संघाचं नेतृत्त्व करतो. या स्पर्धेतील नुकत्याच झालेल्या सामन्यात अश्विनच्या संघाला भारताचा मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीने विजय मिळवून दिला. हे पाहताच अश्विन भावुक झाला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
रविवारी चेन्नई सुपर किंग्जच्या मैदानावर झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने शेवटच्या चेंडूवर दिंडीगुल ड्रॅगन्सला शानदार विजय मिळवून दिला. चक्रवर्तीने शेवटच्या दोन चेंडूत एक षटकार आणि एक चौकार लगावत ड्रॅगन्सला विजयी आघाडी मिळवून दिली आणि एसकेएम सलेम स्पार्टन्सवर दोन विकेटने थरारक विजय मिळवला.
वरूण चक्रवर्तीने चौकार-षटकार लगावत अखेरच्या चेंडूवर मिळवला थरारक विजय
१८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ड्रॅगन्सना शेवटच्या षटकात ११ धावांची आवश्यकता होती. वेगवान गोलंदाज एम. पोयमोझीने सुरूवातीचे चार चेंडू कमालीचे टाकले. त्यात एम. कार्तिक सरनलाही बाद करून सलेमच्या बाजूने सामना वळवला. शेवटच्या दोन चेंडूत अश्विनच्या संघाला आठ धावांची आवश्यकता असताना, एका नो-बॉलने सामन्याचं रूप पालटलं.
फ्री हिटवर चक्रवर्तीने लाँग-ऑनवर षटकार खेचला आणि अखेरच्या चेंडूवर चौकार खेचत त्याच्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. संघाला विजय मिळताच खेळाडू मैदानावर धावत जाऊन वरूणच्या गळ्यात पडले आणि त्याचं कौतुक करत होते. यादरम्यान अश्विन मात्र डोकं खाली करून या विजयाने भावुक झाला होता.
दिंडीगुल संघाकडून अश्विनने सलामीला उतरून कमालीची फटकेबाजी केली. त्याने १४ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ३५ धावा करत दिंडीगुलला धमाकेदार सुरुवात करून दिली आणि त्यांच्या संघाला ३.२ षटकांत ५० धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. त्याची ही वेगवान खेळी संघासाठी महत्त्वपू्र्ण ठरली. शिवम सिंगने २४ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले, तर आर के जयंत (१५ चेंडूत २५), हुनी सैनी (२८ चेंडूत ३५) आणि विमल खुमार यांनी उपयुक्त धावा काढत ड्रॅगन्स संघाचा डाव पुढे नेला. अश्विनने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आणि चार षटकांत २२ धावा देत ३ विकेट घेतले.