R Ashwin On Usman Tariq Bowling Action: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा हाय व्हॉल्टेज सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजाची जोरदार चर्चा रंलगी आहे. फिरकी गोलंदाज उस्मान तारिकने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत दमदार गोलंदाजी केली आहे. तो चेंडू कधी रिलीज करतो, याचा फलंदाजांना अचूक अंदाज घेता येत नाही. त्यामुळे फलंदाजांचा फटका फसतो. त्याच्या साईडआर्म गोलंदाजीचा सामना करताना फलंदाज अडचणीत आल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान भारत-पाकिस्तान सामन्याआधी भारताचा स्टार गोलंदाज आर. अश्विनने उस्मान तारिक गोलंदाजीला आला की भारतीय फलंदाजांनी काय करायला हवं? याबाबत सल्ला दिला आहे.
उस्मान तारिकला गोलंदाजीत यश मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे, तो हातातून चेंडू सोडण्याआधी थांबतो. त्यामुळे फलंदाजांना शॉट खेळताना अडचण येते. अश्विन म्हणाला, जर उस्मान तारिक गोलंदाजीला आला आणि चेंडू सोडण्याआधी तो थांबला, तर भारतीय फलंदाजांनी एकच काम करावं ते म्हणजे क्रीज सोडून बाहेर जावं. हे पूर्णपणे कायदेशीर आहे. हेच जर सतत घडत राहिलं, तर अंपायर उस्मान तारिकला वॉर्निंग देतील.
आर अश्विन हा भारतीय क्रिकेटमधील स्मार्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. आता भारत- पाकिस्तान सामन्याआधीही त्याने स्मार्ट आयडीया दिली आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना तो म्हणाला, “मल एक गोष्ट पाहायची आहे, असं करण्याची हिंमत कोण करणार? जर तारिक गोलंदाजीला आला आणि थांबला, तर फलंदाजांकडे क्रीज सोडण्याचा अधिकार आहे. गोलंदाज चेंडू कधी टाकणार, याचा अंदाज न आल्याने मी बाजूला झालो, असं म्हणायचा अधिकार फलंदाजाकडे आहे.
अश्विन पुढे म्हणाला की, “हे जर सतत होत राहिलं, तर अंपायर्सची डोकेदुखी वाढणार. गोलंदाजाला वॉर्निंग द्यायची की फलंदाजांना, हे अंपायर्सला ठरवावं लागेल. गोलंदाजाला वॉर्निंग मिळण्याची शक्यता जास्त आहे.” जर फलंदाज सतत असं करत राहिले, तर याचा परिणाम तारिकच्या गोलंदाजीवर होणार आहे. त्यामुळे त्याला आपल्या अॅक्शनमध्येही बदल करावा लागू शकतो. हे त्याच्यासाठी मुळीच सोपं नसेल, असं अश्विन म्हणाला.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधी पाकिस्तानने भारतीय संघाविरूद्ध खेळण्यास नकार दिला होता. ठरलेल्या वेळापत्रकानुसार, पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत- पाकिस्तान सामना १५ फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबोत होणार आहे. पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण शेवटी आयसीसीसमोर पाकिस्तानला झुकावं लागलं आहे.
