विंडीजच्या लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

सामन्यात सिमन्सने दमदार खेळी केली. त्याला निकोलस पूरनने उत्तम साथ दिली. विंडीजचा दुसरा गडी बाद झाल्यानंतर पूरन मैदानावर आला. त्याने केवळ १८ चेंडूत ३८ धावा कुटल्या. त्यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार खेचले. त्याच्या खेळीची अश्विनला भुरळ पडली. अश्विनने ट्विटरवरून त्याच्या खेळीची प्रशंसा केली.अश्विन आणि पूरन गेल्या हंगामात पंजाब संघाकडून खेळले होते. त्यामुळे अश्विनने त्याच्या माजी सहकाऱ्याची तोंडभरून स्तुती केली.

दरम्यान, सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. एविन लुईस आणि शिमरॉन हेटमायर यांना माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. मात्र सिमन्सवर अंकुश लावण्यात त्यांना अपयश आलं. सिमन्सने या सामन्यात नाबाद ६७ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर, जाडेजाने १-१ बळी घेतला.

त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. शिवम दुबेचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाज त्यांच्या लौकिकाला साजेशी खेळी करु शकला नाही. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या शिवम दुबेने आपलं टी-२० क्रिकेटमधलं पहिलं अर्धशतक ठोकत महत्वपूर्ण भागीदारी रचली आणि भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.