R Ashwin On Yashasvi Jaiswal: बीसीसीआयने न्यूझीलंड दौऱ्यासाठी वनडे आणि कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. या संघांमध्ये काही खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे. तर काही असे खेळाडू आहेत ज्यांना डच्चू देण्यात आला आहे. भारताचा डावखुऱ्या हाताचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वालला चांगली कामगिरी करूनही भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. जैस्वालची निवड न होताच, भारताचा माजी खेळाडू आर अश्विनने मोठं वक्तव्य करत प्रश्न उपस्थित केले आहेत .
बीसीसीआयने शुक्रवारी कसोटी आणि वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आतापर्यंत झालेल्या वनडे मालिकांमध्ये यशस्वी जैस्वालचं नाव संघात होतं. पण न्यूझीलंडसारख्या महत्वाच्या दौऱ्यातून त्याला वगळण्यात आलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विन म्हणाला, “जर शुबमन गिल शेवटचे २ वनडे सामने खेळणार नसेल, तर त्याच्या जागी यशस्वी जैस्वालला संधी मिळायला हवी होती. यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी शुबमन गिल आणि केएल राहुलची स्थिती समजू शकतो. पण यशस्वीत जैस्वालला तर खेळायची संधीच मिळालेली नाही. त्यामुळे मला वाटतं की, त्याचं आत्मविश्वास कमी होत चालला आहे. जर तुम्ही फलंदाजी पाहिली तर, तो २-३ वर्षांआधी जशी फलंदाजी करायचा तशी फलंदाज करत नाहीये.”
“तो रन मशीन होता. जर त्याचा आत्मविश्वास कमी होत चालला असेल, तर टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांनी त्याला शक्य होईल तितकी संधी द्यायला हवी. पण त्याला मुळीच संधी मिळत नाही. हा त्याच्यावर अन्याय आहे.” या आधी अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वालला संघात संधी दिली गेली होती. अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना त्याने ८६ चेंडूंमध्ये ११० धावांची खेळी केली होती.
सुरुवातीच्या ३ सामन्यांसाठी असा आहे भारतीय संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टिरक्षक), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव.
चौथ्या आणि पाचव्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टिरक्षक आणि उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, आकीब नबी, नमन धीर, ऋतुराज गायकवाड, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), यश ठाकूर, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
