स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यांच्या तीक्ष्ण टीकेमुळे अनेकांना त्रास झाला आहे, अगदी भारतीय क्रिकेटपटूही याला अपवाद राहिलेले नाहीत. अशीच एक टीकेमुळे भारतीय संघाच्या दिग्गज खेळाडूला वाईट वाटलं होतं. त्या खेळाडूला इतकं वाईट वाटलं होतं की त्याने मांजरेकरांशी अनेक वर्षे बोलणंच बंद केलं होतं.

भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकरांच्या अनेक वक्तव्यावरून मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला आहे. त्यांचे लेख किंवा कॉमेंट्रीदरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी ट्रोलदेखील केलं आहे. तर दरम्यान बऱ्याच वर्षांपूर्वीची एक घटनादेखील समोर आली आहे. भारताचा माजी खेळाडू रविचंद्रन अश्विन अशाच एका टीकेमुळे बरीच वर्षे त्यांच्याशी बोलला नव्हता.

अश्विनने खुलासा केला की ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दौऱ्यावरून परतताना त्याने मांजरेकरांचा एक मोठा लेख वाचला. त्या लेखात त्याच्या फिटनेसवर कठोर टीका करण्यात आली होती. जिओहॉटस्टारवरील मुलाखतीत अश्विन म्हणाला, “मी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दौऱ्यावरून परतत होतो. विमानात संजय मांजरेकरांचा एक मोठा लेख वाचला. तो पूर्ण वाचल्यानंतर मला खूप राग आला. राग येणं एक गोष्ट आहे, पण मला खूप वाईटही वाटलं. मी ते मनात ठेवून दिलं. काही काळ मी त्यांच्याशी फारसं बोलतही नव्हतो.”

मात्र त्याने ही नाराजी मनात साठवून न ठेवता स्वतःला बदलण्यासाठी वापरली. अश्विन पुढे म्हणाला, “पुढची चार वर्षे मी स्वतःवर खूप मेहनत घेतली. मी नैसर्गिकरित्या मोठा अॅथलीट नव्हतो. नंतर २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा एक लेख लिहिला आणि माझ्या गोलंदाजीचं कौतुक केलं. तेव्हा मी त्यांचा नंबर शोधून त्यांना मेसेज केला की तुमच्या त्या जुन्या लेखाने माझं आयुष्य बदललं. मी टीकेतून काही शिकण्यासारखं आहे का, हे नेहमी पाहतो.”

अश्विनने डिसेंबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताला कसोटी क्रिकेटमधील बलाढ्य संघ बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्याने १०६ कसोटींमध्ये २४ च्या सरासरीने ५३७ विकेट्स घेतल्या. ११६ एकदिवसीय सामन्यांत १५६ विकेट्स, तर ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ७२ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. फलंदाजीतही त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३,५०३ धावा केल्या असून त्यात सहा शतकं आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्तीनंतरही अश्विन टी-२० स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो. २०२६ तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये तो डिंडीगुल ड्रॅगन्सकडून खेळला, तर यंदा मेजर लीग क्रिकेटमध्ये सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचेही प्रतिनिधित्व केले. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याचा सहभाग केवळ एका सामन्यापुरता मर्यादित राहिला. सध्या अश्विन समालोचन आणि यूट्यूबवरील विश्लेषणात्मक कार्यक्रमांमधूनही सक्रिय आहे आणि भारतीय क्रिकेटमधील मोठ्या घडामोडींवर नियमितपणे आपलं मत मांडताना दिसतो.