R Ashwin On Pakistan Defeat: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १७५ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ११४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ६१ धावांनी आपल्या नावावर केला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाज चमकले. तर पाकिस्तानच्या खेळाडूंकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला. दरम्यान या सामन्यानंतर भारताचा माजी खेळाडू आर अश्विनने पाकिस्तानचं नेमकं काय चुकलं याबाबत खुलासा केला आहे.
या सामन्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना आर अश्विन म्हणाला, “पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आपण झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहिला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला १७० धावांचा पाठलाग करणंही जड झालं होतं. आयपीएलमध्ये जर एखाद्या संघाला शेवटच्या १० षटकात १०० धावा करायच्या असतील, तर ते सहज होऊन जातं. पण हे वर्ल्डकपमध्ये होत नाहीये. प्रेमदासा स्टेडियममध्ये तुम्ही १० षटकात १०० धावांचा पाठलाग करू शकत नाही.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “ज्या पद्धतीने भारतीय खेळाडू दबावाचा सामना करतात, ते पाहता भारतीय खेळाडू १०० पटीने उत्तम आहेत. पाकिस्तानचा संघ तितका सक्षम आहे, असं मला मुळीच वाटत नाही. खरं सांगू, तर सलमान अली आघा आणि माईक हेसनच्या नेतृत्वात पाकिस्तानची टेक्निक चांगली झाली आहे. पण ज्या पद्धतीने त्यांनी सलमान अली आघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शाहिन आफ्रिदीला गोलंदाजीला बोलवलं ही सर्वात मोठी चूक होती.”
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला अभिषेक शर्मा शून्यावर माघारी परतला.त्यानंतर इशान किशनने भारतीय संघाचा डाव सांभाळला. इशानने ७७ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १७५ धावांपर्यंत पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर पाकिस्तानच डाव ११४ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ६१ धावांनी आपल्या नावावर केला.

