R Ashwin Slams Gautam Gambhir and India Team Management: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनला वगळून त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. संजू सॅमसन तीन सामन्यांत धावा करण्यात अपयशी ठरला होता. त्यानंतर त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला खेळवण्यात आला. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर चाहत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्टार फलंदाज संजू सॅमसनला संघातून वगळण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अश्विनचं असं मत आहे की, देशासाठी विश्वचषक जिंकण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या खेळाडूंना संघ व्यवस्थापनाकडून अधिक संधी देत त्यांच्यात स्पष्ट संवाद असायला हवा. या निर्णयावर टीका करताना अश्विन म्हणाला की, खेळाडूंना इतक्या लवकर संघातून वगळल्याने ड्रेसिंग रूममधील वातावरण बिघडू शकतं आणि खेळाडूंच्या आत्मविश्वासावर याचा खोलवर परिणाम होऊ शकतो.

संघ व्यवस्थापनाच्या संजूला वगळण्याच्या निर्णयानंतर आता झिम्बाब्वेविरूद्धच्या टी-२० संघातही त्याची निवड करण्यात आलेली नाही. संजूची टी-२० संघात निवड न झाल्याचे दिसताच चाहत्यांनी सोशल मीडियावर बीसीसीआयला प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. संजूला वगळत प्रभसिमरन सिंगला संघात इशान किशनसह दुसरा यष्टीरक्षक म्हणून निवडलं आहे.

सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनच्या जागी, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली. या निर्णयावर भाष्य करताना आणि संघाच्या निवड प्रक्रियेवर तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अश्विन आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला, “तुमच्यासमोर दोन-तीन मालिका आहेत. जो चांगली कामगिरी करतो, तो संघात टिकून राहतो. पण एखाद्या खेळाडूने जर आपल्याला विश्वचषक जिंकून दिला असेल, तर मी त्याला थोडी अधिक संधी देईन. जेव्हा सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आलं, तेव्हा मी हेच म्हटलं होतं. त्याला कर्णधारपदावरून हटवणं ठीक होतं, पण त्याला संघातूनच वगळणं हा कदाचित योग्य निर्णय नव्हता. मी खेळाडूंना स्पष्टपणे सांगितलं असतं की, या मालिकांमध्ये खेळा आणि आपलं स्थान निश्चित करा. जर तुम्ही चांगली कामगिरी केली, तर कोणीही तुम्हाला संघातून वगळू शकत नाही.

संजू सॅसमन गौतम गंभीरचं नाव घेत नेमकं काय म्हणाला?

अश्विनच्या मते, सॅमसनला वगळल्यामुळे संघाच्या फलंदाजीचा समतोलही बिघडला आहे. प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासह कोचिंग स्टाफला लवकरच या चुकीची जाणीव होईल, असे संकेत त्याने दिले. अश्विन म्हणाला, “सध्या मला चिंता वाटत आहे कारण संजू सॅमसनला संघातून खूपच घाईघाईने वगळण्यात आलं. संजूच्या मनात सध्या काय विचार चालले असतील? तो नेट्समध्ये कोणत्या मानसिकतेने सराव करेल? सध्या भारतीय संघाच्या वरच्या फळीत सलग तीन डावखुरे फलंदाज आहेत. मला वाटतं की संघाचा समतोल राखण्यासाठी संजूला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा विचार करू शकतो; कारण गौतम गंभीर यांच्यासह संपूर्ण कोचिंग स्टाफला हे माहित आहे की संजूवर अन्याय झाला आहे.”

सततच्या बदलांमुळे संघात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, असा इशारा अश्विनने दिला. तो म्हणाला, “हे संघाच्या हिताचं नाही. जर आज संजूला वगळलं, आधी सूर्याला बाहेर केलं, तर प्रत्येक खेळाडूला वाटू लागेल की पुढचा नंबर आपला असू शकतो. असं वातावरण कोणत्याही संघासाठी कधीही हिताचं मानलं जाऊ शकत नाही.”