R Ashwin on Chennai Super Kings: आयपीएल २०२६ची सुरूवात चेन्नई सुपर किंग्ससाठी फारच निराशाजनक राहिली आहे. पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावणारा चेन्नईच्या संघाने सलग दोन सामने गमावले आहेत. सलग पराभवांमुळे संघ गुणतालिकेच्या तळाशी पोहोचले आहेत. घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यात २०० अधिक धावांचा डोंगर उभारूनही संघाला धावांचा बचाव करता आला नाही आणि पंजाबने सहज नोंदवला. संघाच्या या कामगिरीनंतर आर अश्विनच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
भारताचा माजी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने चेन्नई सुपर किंग्जच्या कामगिरीबाबत स्पष्ट आणि कठोर प्रतिक्रिया दिली. चेपॉकच्या घरच्या मैदानावर पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर आपल्या माजी संघाची कामगिरी पाहणं “वेदनादायक” असल्याचं त्याने म्हटलं. आपलं मत मांडल्यामुळे टीका होईल, याची जाणीव असूनही संघाच्या घसरलेल्या दर्जाकडे दुर्लक्ष करता येत नाही, असंही तो म्हणाला.
अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर संघाच्या कामगिरीबद्दल स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. अश्विन म्हणाला, “कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही मी कुठल्याही खेळाडूला दोष देत नाही. पण बाहेरून पाहताना कधी कधी हे पाहणं कठीण होतं. हा संघ एकेकाळी कसा होता, हे तुम्हाला माहित आहे ना? आज स्टेडियममधून, समालोचन बॉक्समधून सामना पाहताना मला हे जाणवलं,” असे अश्विन म्हणाला.
“लोक मला नाव ठेवतील, मला फरक पडत नाही. तुम्ही मला जज करा, मला शिव्या घाला काहीही बोला, त्याने काही फरक पडत नाही. माझ्यासाठी चेन्नई हा अभिमानाचा विषय आहे. तुम्ही काहीही विचार करा, मला त्याची चिंता नाही. पण आज मी हा संघ पाहिला तेव्हा १५व्या षटकापर्यंत सगळ्यांचे खांदे पडलेले दिसले. ते पाहणं खूप वेदनादायक होतं. खूपच त्रासदायक. नवख्या खेळाडूंची देहबोली तर स्पष्ट दिसून येत होती, संपूर्ण वातावरणच बदललेलं जाणवलं. ते चित्र खरंच खूप निराशाजनक होतं,” असे तो पुढे म्हणाला.
अश्विनने यावेळी महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीलाही संघाच्या मानसिकतेवर परिणाम करणारा घटक मानलं. पोटरीच्या दुखापतीमुळे सध्या बाहेर असलेला आणि हळूहळू मैदानावरील भूमिका कमी करत असलेला धोनी चेपॉकमधील या सामन्यात खेळला नाही, त्यामुळे नेतृत्वातही मोठी पोकळी जाणवली.
“ते कल्चर पुन्हा आणा. मला अजूनही वाटतं हा संघ टॉप-४ मध्ये पोहोचू शकतो. मला पूर्ण विश्वास आहे, फक्त गोष्टी योग्य पद्धतीने घडायला हव्यात. आज एकच खंत वाटली, एमएस धोनी मैदानात नव्हता. तो असता तर अशा खेळाडूंना खूप फायदा झाला असता. ड्रेसिंग रूममध्ये त्याची उपस्थितीच वातावरण पूर्णपणे बदलून टाकते,” असे अश्विन म्हणाला.
