पाफोस : भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदच्या ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा जिंकण्याच्या आशांना मोठा धक्का बसला असून आठव्या फेरीत त्याला अनिश गिरीकडून पराभव पत्करावा लागला आहे. त्याच वेळी महिलांमध्ये भारताच्या दिव्या देशमुखने युक्रेनच्या ॲना मुझिचुकवर विजयाची नोंद केली.

प्रज्ञानंदने या स्पर्धेची दिमाखात सुरुवात करताना गिरीवर मात केली होती. मात्र, परतीच्या लढतीत गिरीने पांढर्‍या मोहर्‍यांनी खेळताना या पराभवाची परतफेड केली. त्यामुळे प्रज्ञानंदचे आता आठ फेर्‍यांअंती केवळ ३.५ गुण राहिले असून अग्रस्थानावरील जावोखिर सिंदारोवपेक्षा (६.५) तो आता तीन गुणांनी मागे पडला आहे. या स्पर्धेच्या आता केवळ सहा फेर्‍या शिल्लक असल्याने प्रज्ञानंदला जेतेपद पटकावणे जवळपास अशक्यच झाले आहे.

आठव्या फेरीत दोन अमेरिकन ग्रँडमास्टरमध्ये झालेल्या लढतीत हिकारू नाकामुराने फॅबियानो कारुआनाला नमवले. सिंदारोवने आंद्रे एसिपेन्कोविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली. त्यामुळे आता सिंदारोव अन्य प्रतिस्पध्र्यांपेक्षा दोन गुणांनी आघाडीवर आहे. कारुआना आणि गिरी यांचे समान ४.५ गुण आहेत.

महिलांमध्ये आर. वैशाली आणि कझाकस्तानची बिबिसारा असाऊबायेवा यांच्यातील लढत बरोबरीत संपली. कॅटरिना लायनोने ॲलेक्सांड्रा गोर्याचकिनाला पराभूत केले. चीनच्या दोन खेळाडूंमधील लढतीत झू जिनेरने टॅन झोंगयीचा पराभव केला. दिव्याने काळ्या मोहर्‍यांनी खेळताना सुरुवातीच्या संघर्षानंतर मुझिचुकवर मात केली. आठ फेर्‍यांअंती महिलांमध्ये जिनेर, मुझिचुक, लायनो, दिव्या आणि वैशाली समान ४.५ गुणांसह संयुक्त अग्रस्थानी आहेत.