R Vaishali Creates History in World Of Chess: भारताचे बुद्धिबळपटू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत भारताचा तिरंगा मानाने उंचावताना दिसत आहेत. पुरूष बुद्धिबळपटूंबरोबरच महिला बुद्धिबळपटूदेखील जागतिक स्तरावर आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. आर वैशाली हिने सध्या सुरू असलेल्या महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. यासह तिने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेचा क्लायमॅक्स इतका नाट्यमय असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. पण आर. वैशालीने आपल्या अनुभवाचा आणि संयमाचा कस लावत अशक्य वाटणारा विजय खेचून आणला. जागतिक चॅम्पियनशिपच्या लढतीसाठी गेल्या १५ वर्षांत ती पात्र ठरणारी पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. तिच्या या यशाने भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्णयुगाची पुन्हा सुरुवात झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या संघर्षात वैशालीचा आत्मविश्वासच तिचा सर्वात मोठा हुकुमी एक्का ठरला.

या निकालामुळे बुद्धिबळाच्या इतिहासात फक्त दुसऱ्यांदाच एखादी भारतीय महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या किताबासाठी लढणार आहे. वैशाली ही या मानाच्या स्पर्धेत पोहोचणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. तिच्याआधी कोनेरू हम्पीने २०११ मध्ये अल्बेनियातील तिराना येथे हौ यिफानविरुद्ध महिलांच्या किताबासाठी आव्हान दिलं होतं. तर कोनेरू हम्पीनंतर आता आर वैशाली गेल्या १५ वर्षांत ही कामगिरी करणारी पहिली खेळाडू ठरली.

प्रज्ञानानंद आणि वैशाली ही बहिणभावांची जोडी कॅंडिडेट्स स्पर्धेत दुसऱ्यांदाच सहभागी झाले होते. १४ फेऱ्यांच्या या स्पर्धेत पाच फेऱ्यांनंतर वैशाली दिव्या देशमुख आणि तान झोंगयी यांच्यासोबत शेवटच्या स्थानावर होती. पण त्यानंतर तिच्या खेळात झालेला बदल इतका जबरदस्त होता की जिथे दिव्या आणि तान शेवटच्या दोन स्थानांवर राहिल्या, तिथे वैशाली थेट अव्वल स्थानावर पोहोचली.

वैशालीचं हे दमदार पुनरागमन फार आश्चर्यकारक नाही. दोन वर्षांपूर्वी टोरांटो येथे झालेल्या कॅंडिडेट्स स्पर्धेतही ती पहिल्या नऊ फेऱ्यांनंतर सलग चार पराभवांमुळे शेवटच्या स्थानावर होती. मात्र त्यानंतर तिने सलग पाच सामने जिंकत जबरदस्त पुनरागमन केलं होतं आणि ती जवळपास संपूर्ण स्पर्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली होती.