वृत्तसंस्था, पाफोस

लोकांना तुमच्याकडून अपेक्षा नसणे काही वेळा फायद्याचेच ठरते. तुमच्यावर कोणतेही दडपण नसते, त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने तुमचा नैसर्गिक खेळ करू शकता, असे मत ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा विजेती भारताची ग्रँडमास्टर  आर. वैशालीने व्यक्त केले.

वैशालीने ‘कँडिडेट्स’चे जेतेपद पटकावत महिलांच्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत विद्यमान जगज्जेत्या चीनच्या जू वेन्जूनला आव्हान देण्याची संधी मिळवली आहे. सायप्रस येथे झालेल्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेतील महिला विभागात वैशाली सर्वांत कमी रेटिंग असलेली खेळाडू होती. त्यामुळे जेतेपदासाठी तिला दावेदार मानले जात नव्हते. मात्र, अन्य सात स्पर्धकांपेक्षा दर्जेदार खेळ करून २४ वर्षीय वैशालीने बाजी मारली.

‘‘माझ्याकडून कोणालाही काहीही अपेक्षा नव्हती. ही बाब निश्चितपणे माझ्या पथ्यावर पडली. मला ‘अंडरडॉग’ असणे आवडते. त्यामुळे मी कोणत्याही दडपणाविना खेळू शकते आणि या स्थितीत मला सर्वोत्तम खेळ करणे अधिक सोपे जाते. कँडिडेट्स स्पर्धा जिंकणे हे माझ्या आजवरच्या कारकीर्दीतील सर्वांत मोठे यश आहे,’’ असे वैशालीने ‘कँडिडेट्स’च्या पारितोषिक वितरण समारंभानंतरच्या मुलाखतीत सांगितले.

तसेच आता जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी आपण खूप उत्सुक असल्याचेही ती म्हणाली. ‘‘मी खूप उत्साहित आहे, कारण लहानपणी मी चेन्नईमध्ये झालेला जगज्जेतेपदाचा (२०१३) सामना पाहिला होता. विश्वनाथन आनंद सर आणि मॅग्नस कार्लसन यांच्यात ती लढत होती. ते काचेच्या मागे खेळत होते आणि तो अनुभव खूप खास होता. आता अनेक वर्षांनंतर मला असा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे,’’ असे वैशालीने सांगितले.

‘‘जू वेन्जून खूप अनुभवी आणि अलौकिक दर्जाची खेळाडू आहे. तिने पाच वेळा विश्वविजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध खेळणे निश्चितपणे आव्हानात्मक असेल. मात्र, माझ्याकडे खेळात सुधारणा करण्यासाठी अजून वेळ आहे. मी माझा सर्वोत्तम प्रयत्न करेन,’’ असे वैशालीने शेवटी नमूद केले.