रघुनंदन गोखले, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक
भारताच्या २५ वर्षीय रमेशबाबू वैशालीने ‘कँडिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धा जिंकत नवा इतिहास घडवला. ही स्पर्धा जिंकून जगज्जेत्या जू वेन्जूनची आव्हानवीर बनणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. परंतु कायम डोके शांत ठेवून आणि आणीबाणीच्या काळात डगमगून न जाता वैशालीने हे यश मिळवले आहे.

आठ खेळाडूंमध्ये सर्वांत कमी रेटिंगची खेळाडू वैशाली होती आणि तिला कोणी खिजगणतीतही धरत नव्हते. माजी जगज्जेती टॅन झोंगयी आणि अग्रमानांकित झू जिनेर या चिनी खेळाडूंचा दबदबा होताच! विश्वचषक विजेती दिव्या देशमुख आणि माजी ‘कँडिडेट्स’ विजेती ॲलेक्सांड्रा गोर्याचकिना यांनाही जाणकार कौल देत होते.

ससा-कासवाच्या शर्यतीची जी कथा आहे, तसेच काहीसे सायप्रसच्या निसर्गरम्य बेटावर घडले. वैशालीची सुरुवात अतिशय धीमी होती. पहिले चार डाव बरोबरीत सुटल्यावर पाचवा डाव ती झू जिनेरविरुद्ध हरली, त्या वेळी ती सर्वांत तळाला होती. पण वैशालीच्या खेळाचा इतिहास पाहता आणि विशेषत: तिची २०२४ मधील कामगिरी बघता ती आता चमत्कार घडवणार अशी तिच्या चाहत्यांना अपेक्षा होती. त्या प्रमाणे तिने पुढील चारपैकी तीन डाव जिंकून आघाडी घेतली. तिच्या प्रतिस्पर्धी गडबडून गेल्यासारख्या तिच्याविरुद्ध खेळत होत्या. गेल्या अर्थात कॅनडा येथे झालेल्या २०२४ सालच्या कँडिडेट्समध्येही वैशालीने अशीच काही करामत केली होती.

त्या वेळी पहिल्या नऊ फेर्‍यांमध्ये विजयाच्या दुष्काळात राहणार्‍या झुंजार वैशालीने त्यानंतर विजयांचा धडाका लावून अखेरच्या पाच डावांत आपल्या प्रतिस्पध्र्यांना नामोहरम केले आणि चक्क दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली होती. सायप्रसमध्ये वैशाली प्रगल्भ झाल्याचे तिच्या खेळावरूनच नव्हे तर तिच्या निकालावरूनही स्पष्ट दिसत होते. एकदा संयुक्त आघाडी घेतल्यावर तिच्या बरोबरच्या आघाडीवीर बदलत होत्या, पण वैशाली मात्र अढळ होती.

वैशालीच्या या विजयाचे श्रेय अर्थात सायप्रसमध्ये स्पर्धेदरम्यान तिला मदत करणारा १९ वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश आणि तिचे मुख्य प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या रमेशला जाते. मात्र, तिला रसम-भात खाऊ घालणार्‍या तिच्या आई नागलक्ष्मी यांनाही आपल्याला विसरता येणार नाही. ‘सैन्य पोटावर चालतात’ अशी एक म्हण आहे आणि भारतीय बुद्धिबळ खेळाडूंसाठी ती तंतोतंत लागू पडते हे मी माझ्या अनुभवावरून सांगू शकतो.

आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते चिनी जगज्जेती जू वेन्जून आणि वैशाली यांच्या जागतिक विजेतेपदाच्या सामन्याकडे! जू पाच वेळा जगज्जेती झाली आहे आणि तिच्या खेळाचा अभ्यास बघता वैशालीला जिंकण्यासाठी जीवाचे रान करावे लागेल हे तर उघड आहे. जू वैशालीप्रमाणेच डगमगून न जाणारी आहे आणि एका वर्षांत दोन वेगवेगळी जागतिक अजिंक्यपदे जिंकण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. २०१८ साली मे महिन्यात टॅन झोंगयीविरुद्ध जिंकून आपले पहिले विश्वविजेतेपद जिंकणार्‍या जू हिला नोव्हेंबरमध्ये ६४ खेळाडूंच्या ‘नॉकआऊट’ स्पर्धेत पुढील जगज्जेतेपद जिंकावे लागले. त्यानंतर आजपर्यंत ती आपल्या सिंहासनावर आरूढ आहे. एवढेच नव्हे तर मॅग्नस कार्लसनप्रमाणे जलदगती आणि विद्युतगती जगज्जेतेपदेही तिने खिशात घातली आहेत.

दोन वर्षांपूर्वी भारत विरुद्ध चीन अशा या जगज्जेतेपदाच्या सामन्यात गुकेशने डिंग लिरेनवर मात केली होती. वैशाली या वर्षी त्याची पुनरावृत्ती करेल का, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.