वृत्तसंस्था, पाफोस
‘कँडिडेट्स’ स्पर्धेत अडखळत्या सुरुवातीनंतर शेवटच्या तीन फेर्या शिल्लक असताना एका गुणाच्या आघाडीसह अग्रस्थानी असणे मला अपेक्षित नव्हते. त्यामुळे मला दडपणही जाणवत होते. मात्र, १२ व्या फेरीत मी झू जिनेरकडून पराभूत झाले. त्यानंतर गोष्टी पुन्हा सामान्य झाल्या. शेवटच्या दोन फेर्यांत मी दडपण चांगल्या पद्धतीने हाताळले. तसेच स्पर्धेच्या ठिकाणी आई माझ्याबरोबर असल्याचाही मला फायदा झाला. आई आणि ‘प्राग’ (धाकटा भाऊ प्रज्ञानंद) यांच्या पाठिंब्याविना मी हे यश मिळवू शकले नसते, अशी भावना ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. वैशालीने व्यक्त केली.
सायप्रस येथे झालेल्या ‘कँडिडेट्स’ अर्थात आव्हानवीरांच्या स्पर्धेत महिला विभागात वैशालीने जेतेपद पटकावत इतिहास घडवला. ही स्पर्धा जिंकणारी ती भारताची महिला बुद्धिबळपटू ठरली. या कामगिरीमुळे तिने जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत जगज्जेत्या चीनच्या जू वेन्जूनला आव्हान देण्याची संधी मिळवली आहे.
‘‘या जेतेपदाचा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. माझ्यासाठी ही स्वप्नवत कामगिरी आहे. माझ्याकडे एका गुणाची आघाडी होती आणि मी झू जिनेरविरुद्ध (१२ व्या फेरीत) पराभूत झाले. त्यानंतर अन्य स्पर्धकांनाही संधी निर्माण झाली. मात्र, अखेरच्या दोन दिवसांत मी ज्या प्रकारे दडपण हाताळले आणि लक्षपूर्वक खेळ करू शकले, याबाबत समाधानी आहे,’’ असे वैशाली म्हणाली.
‘‘जिनेरविरुद्धच्या लढतीपूर्वी एका गुणाची आघाडी मला मुळीच अपेक्षित नव्हती. त्यामुळे मला दडपण जाणवत होते. त्यानंतर मला जिनेरकडून हार पत्करावी लागली. अखेरच्या दोन दिवशी मी केवळ खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. निकाल आपल्या हातात नाही, पण अधिकाधिक अचूक खेळ करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो असे स्वत:ला सांगितले. त्यामुळे मला दडपणावर मात करता आली. याचा माझ्या खेळावर सकारात्मक परिणाम झाला,’’ असेही वैशालीने नमूद केले.
कुटुंबाला श्रेय
यंदा ‘कँडिडेट्स’मध्ये खेळणारी वैशाली ही तिच्या कुटुंबातील एकमेव सदस्य नव्हती. तिचा धाकटा भाऊ प्रज्ञानंदने खुल्या विभागात आव्हान उपस्थित केले. तसेच त्यांची आई नागलक्ष्मी यासुद्धा त्यांच्याबरोबर सायप्रस येथे होत्या. ‘‘कुटुंबीयांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा ठरतो. विशेषत: कँडिडेट्ससारख्या स्पर्धेत तुमची मानसिक कसोटी लागते. ही स्पर्धा खूप प्रदीर्घ काळ चालते. त्यामुळे कुटुंबीयांची साथ मोलाची ठरते. माझी आई आणि ‘प्राग’ इथे माझ्याबरोबर होते, हे माझे भाग्यच. त्यांनी मला खूप पाठबळ दिले,’’ असे वैशालीने नमूद केले.
प्रज्ञानंदकडून ‘अक्का’चे कौतुक
‘‘वैशाली अक्काचे अभिनंदन! तू जे यश संपादन केले आहेस, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या स्पर्धेतील अत्यंत निर्णायक क्षणांना तू ज्या प्रकारे हाताळलेस, ते पाहणे खरोखरच प्रेरणादायी होते. तुझ्या कठोर परिश्रमाचे हे फळ पाहून आम्हाला खूप आनंद झाला आहे,’’ अशा शब्दांत वैशालीचा भाऊ प्रज्ञानंदने तिचे कौतुक केले.
‘ग्रँड स्विस’मधील यश महत्त्वाचे
‘कँडिडेट्स’ विजेतेपद हे गेल्या दोन वर्षांतील मेहनतीचे फळ असल्याचे वैशालीला वाटते. ‘‘मी या स्पर्धेसाठी खूप तयारी केली होती. गेल्या दोन वर्षांत मला बराच संघर्ष करावा लागला. मात्र, मी मेहनत घेणे सोडले नाही. विशेषत: गेले वर्ष माझ्यासाठी खूप अवघड होते. मला फारसे यश मिळत नव्हते. मात्र, ‘ग्रँड स्विस’ स्पर्धेत माझ्याकडून सर्वोत्तम खेळ झाला आणि मी विजेतेपद मिळवले. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. शिवाय या विजेतेपदामुळे मी ‘कँडिडेट्स’साठी पात्र ठरले. त्यानंतर सकारात्मक गोष्टी घडत गेल्या,’’ असे वैशाली म्हणाली.
भारतासाठी अभिमानास्पद बाब -विश्वनाथन आनंद
भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू आणि वैशालीचा ‘गुरू’ विश्वनाथन आनंदने ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिचे कौतुक केले. यंदा जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत भारताचे दोन बुद्धिबळपटू खेळणार आहेत. पुरुषांमध्ये दोम्माराजू गुकेश जगज्जेतेपद राखण्याचा प्रयत्न करेल, तर महिलांमध्ये वैशाली कारकीर्दीतील पहिले जगज्जेतेपद मिळवण्यास उत्सुक असेल. भारतासाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे आनंद म्हणाला.
‘‘अभिनंदन वैशाली. तिने उत्कृष्ट तयारी आणि चिकाटी दाखवली. तिने प्रतिस्पध्र्यांच्या आक्रमणाचा नेटाने सामना केला आणि प्रत्युत्तरही दिले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन भारतीयांना पाठिंबा देण्याची संधी मिळणे, ही भारतीय बुद्धिबळासाठी अभिमानास्पद बाब आहे. मला वैयक्तिकरीत्या अभिमान वाटतो की, आमच्या ‘वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमी’च्या शिष्याला आता जगज्जेतेपदासाठी संधी मिळणार आहे. चेन्नईची असणे ही तर आणखी एक अभिमानाची गोष्ट आहे,’’ असे आनंदने समाजमाध्यमांवर लिहिले.
