Rachin Ravindra Century: आयपीएल २०२६ स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. पण या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. संपूर्ण हंगामात बाकावर बसून राहिल्यानंतर अखेर त्याने आयपीएल सोडून मायदेशी जाण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडविरूद्ध सुरु असलेल्या सामन्यात कसोटी सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केली.

न्यूझीलंड आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. पहिल्याच डावात फलंदाजी करताना २ फलंदाजांनी शतक झळकावलं आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला या सामन्यात हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. सलामीला आलेला कर्णधार टॉम लेथम शून्यावर माघारी परतला. त्यानंतर ड्वेन कॉन्व्हे अवघ्या ४ धावांवर माघारी परतला. तर केन विलियमसन देखील नावाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. तो अवघ्या ३६ धावा करुन माघारी परतला. टॉप ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर टॉम ब्लंडेल आणि रचिन रवींद्र या दोघांनी मिळून न्यूझीलंडचा डाव सांभाळला.

रचिन रवींद्रने या डावात फलंदाजी करताना १९४ चेंडूंचा सामना करत १२१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ४ षटकार खेचले. या डावात ९९ धावांवर फलंदाजी करत असताना त्याने षटकार खेचून आपलं शतक पूर्ण केलं. पण कोलकाता नाईट रायडर्सने त्याला एकही सामना खेळण्याची संधी दिली नव्हती. याआधी तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २ कोटी रुपये मोजून आपल्या संघात स्थान दिलं होतं.

रचिन रवींद्रसह न्यूझीलंडच्या आणखी एका खेळाडूने शतकी खेळी केली. रचिन रवींद्रला साथ देत टॉम ब्लंडेलला चांगली साथ दिली. ब्लंडेलने २३३ चेंडूंचा सामना करत १४२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १८ चौकार आणि २ षटकार खेचले. पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत न्यूझीलंडने ५ गडी बाद ३६१ धावा केल्या आहेत. सामन्यातील दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा संघ आणखी मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.