Radha Yadav Last Ball Controversy: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने २०३ धावांचा डोंगर उभारला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकण्यासाठी २०४ धावा करायच्या होत्या. महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील फायनलमध्ये याआधी कुठल्याही संघाने इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला नव्हता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर खूप मोठं आव्हान होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोलने निर्णायक खेळी केली. शेवटी विजयी चौकार मारणारी राधा यादवच्या शॉटवरून सोशल मीडियावर चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. त्यावेळी राधा यादव २ चेंडूत ३ आणि नादीन डी क्लार्क ६ धावांवर नाबाद होती. षटकातील सुरवातीच्या दोन्ही चेंडूंवर १-१ धावा आल्या. त्यानंतर शेवटच्या ४ चेंडूंवर ८ धावांची गरज होती. दिल्लीचं पारडं जड होतं. तिसऱ्या चेंडूवर राधा यादवने चौकार खेचला.

या चौकारानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजयासाठी ३ चेंडूत ४ धावांची गरज होती. त्यावेळी राधा यादव बॅकफूटवर जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या वरून कट शॉट खेळून चौकार मारला. शॉट मारताच स्टंप वर असलेली बेल्स उडून खाली पडली. सर्वांना हेच वाटलं की, राधा यादव हिट विकेट झाली आहे. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडू विजयाचा जल्लोष करण्यासाठी मैदानात धावत आले.

नेमकं काय घडलंय हे कोणालाच माहित नव्हतं. रिप्लेमध्ये पाहिलं त्यावेळी समजलं की, शॉट खेळत असताना बॅट आणि स्टंपचा कुठलाही संपर्क झालेला नाही. तर यष्टिरक्षण करत असलेल्या लिजेल लीच्या ग्लोव्हजचा यष्टीला स्पर्ष झाला, त्यामुळे बेल्स खाली पडली. त्यामुळे राधा यादव नाबाद राहिली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला.