थिएम, डेल पोट्रो, रुबलेव्ह उपउपांत्यपूर्व फेरीत; महिलांमध्ये ओस्टोपेन्कोचे आव्हान संपुष्टात

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा

राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. त्यामुळे टेनिसजगतामधील बहुप्रतीक्षित नदाल-फेडरर उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

३१ वर्षीय नदालने अर्जेटिनाच्या लिओनाडरे मेयरचा ६-७ (३/७), ६-१, ६-१, ६-४ असा पराभव केला. नदालने जागतिक क्रमवारीत ५९व्या स्थानावर असलेल्या मेयरविरुद्धची विजयी आकडेवारी ४-० अशी उंचावली आहे. आता उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवण्याच्या निर्धाराने होणाऱ्या पुढील लढतीत नदालची युक्रेनच्या अ‍ॅलेक्झांडर डोल्गोपोलोव्हशी गाठ पडणार आहे. डोल्गोपोलोव्हविरुद्धही त्याची कामगिरी ६-२ अशी आशादायी आहे.

अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेतेपदाला पाच वेळा गवसणी घालणाऱ्या फेडररने ३१व्या मानांकित फॅलिसिआनो लोपेझचा ६-३, ६-३, ७-५ असा पाडाव केला. आपल्या कारकीर्दीतील ६३व्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणाऱ्या फेडररने लोपेझविरुद्ध हा १३वा विजय मिळवला आहे. पुढील फेरीत फेडररचा फिलिप कोलश्च्रेबीरशी सामना होणार आहे. या प्रतिस्पध्र्याविरोधात फेडररची कामगिरी ११-० अशी आहे.

नदालला दुसऱ्या फेरीच्या सामन्यात जपानच्या टॅरो डॅनियलने पहिल्या सेटमध्ये पराभूत केले होते. त्यानंतर उर्वरित तीन सेट त्याला जिंकता आले होते. शनिवारची लढत म्हणजे त्याची पुनरावृत्तीच होती. जागतिक दर्जाची १५ विजेतेपद नावावर असणाऱ्या नदालला पहिल्या सेटमध्ये सहा गुणांपर्यंत पोहोचूनही तो जिंकता आला नाही. मात्र दुसऱ्या सेटमधील सातव्या गेमनंतर सामन्याचे चित्र पालटवण्यात नदालला यश आले.

फेडररला पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे फ्रॉन्सिस तियाफोई आणि मिखाइय यॉझ्नीला नमवण्यासाठी पाच सेटपर्यंत संघर्ष करावा लागला होता. मात्र लोपेझविरुद्धच लढत आरामात जिंकून त्याने १६व्यांदा चौथी फेरी गाठली आहे.

जर्मनीच्या कोलश्च्रेबीर या ३३व्या मानांकित खेळाडूने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमॅनचा ७-५, ६-२, ६-४ असा पराभव केला. याचप्रमाणे ऑस्ट्रियाच्या सहाव्या मानांकित डॉमिनिक थिएमने फ्रान्सच्या अ‍ॅड्रियन मॅनेरिनोवर ७-५, ६-३, ६-४ अशा फरकाने विजय मिळवला आणि मागील चार वर्षांत तिसऱ्यांदा उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. थिएमची पुढील फेरीत २००९मधील विजेत्या ज्युआन मार्टिन डेल पोट्रोशी (अर्जेटिना) गाठ पडणार आहे. डेल पोट्रोने स्पेनच्या रोबटरे बॉटिस्टला ६-३, ६-३, ६-४ अशा फरकाने सहज पराभूत केले.

रशियाचा आंद्रे रुबलेव्ह हा उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाटचाल करणारा दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. त्याने बोस्नियाच्या डॅमिर डूमहूरला ६-४, ६-४, ५-७, ६-४ असे नामोहरम केले. १९ वर्षीय रुबलेव्हची बेल्जियमच्या नवव्या मानांकित डेव्हिड गॉफिनविरुद्ध पुढील लढत होणार आहे. २०१६मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या गाइल मॉनफिल्सने उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे गॉफिनला विजयी घोषित करण्यात आले.

प्लिस्कोव्हाचे अव्वल स्थान शाबूत

महिलांमध्ये अव्वल मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने चीनच्या झंग शुआयला ३-६, ७-५, ६-४ अशा फरकाने हरवले. त्यामुळे तिचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान शाबूत राहिले आहे. २५ वर्षीय प्लिस्कोव्हाची पुढील फेरीत अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडीशी लढत होणार आहे. ब्रॅडीला यंदाच्या वर्षांत फक्त सात विजय मिळवता आले आहेत. मात्र हे सर्व विजय तिने ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये मिळवलेले आहेत. प्लिस्कोव्हाने हा सामना गमावला असता तर तिचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान विम्बल्डन विजेत्या गार्बिन मुगुरुझा किंवा एलिना स्विटोलिना यांच्यापैकी एकीकडे गेले असते.

युक्रेनच्या चौथ्या मानांकित स्विटोलिनाने आपले आव्हान  जिवंत ठेवताना अमेरिकेच्या शेल्बी रॉजर्सचा ६-४, ७-५ असा पराभव केला. रशियाच्या डॅरिआ कॅसॅटकिनाने फ्रेंच विजेत्या जेलिना ओस्टोपेन्कोचा ६-३, ६-२ असा सहज पराभव  केला.

लिओनाडरे मेयरविरुद्धचा

हा सामना आव्हानात्मक होता. परंतु योग्य वेळी मी मानसिकदृष्टय़ा खंबीरपणे लढत दिली.
– राफेल नदाल

पहिल्या दोन फेऱ्यांच्या सामन्यांमध्ये मला संघर्ष करावा लागला होता. मात्र फॅलिसिआनो लोपेझविरुद्धच्या लढतीत मला सहज विजय मिळवता आल्यामुळे आनंद वाटणे स्वाभाविक आहे. तसे अमेरिकन खुल्या स्पर्धेत खेळणे, हे माझ्यासाठी नेहमी सुखद वाटते.
– रॉजर फेडरर

महिला पंचाविषयी अपशब्द उच्चारणाऱ्या फॉगनिनीची हकालपट्टी

न्यूयॉर्क : महिला पंचाविषयी अपशब्द उच्चारल्याप्रकरणी इटलीच्या फॅबिनो फॉगनिनीची अमेरिकन स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत फॉगनिनीने स्टेफानो ट्रॅव्हाग्लिआविरुद्ध हार पत्करली. या सामन्यात त्याने महिला पंच लॉयसे इंगझेलबाबत केलेली विवाहासंदर्भातील टिप्पणी वादग्रस्त ठरली. फॉगनिनी आपला सहकारी सिमॉन बोलेलीसोबत पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचला. परंतु संयोजकांनी त्याला स्पर्धेतून डच्चू दिला आहे. जागतिक क्रमवारीत २६व्या स्थानावर असलेल्या फॉगनिनीला २४ हजार डॉलरचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला आहे.

फॉगनिनीचा निर्णय दिरंगाईने; नदालचे टीकास्त्र

* महिला पंचाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या इटलीच्या फॅबिओ फॉगनिनीची अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यासाठी टेनिस प्रशासनाने तीन दिवसांची दिरंगाई करणे चुकीचे आहे, असे मत राफेल नदालने व्यक्त केले आहे.

* ‘‘हा निर्णय घेण्यात इतके दिवस जाण्याची आवश्यकता नव्हती, असे मला वाटते. ही सकारात्मक घटना नाही. जर तुमचे वर्तन अयोग्य असेल, तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगायलाच हवेत,’’ असे नदालने या वेळी म्हटले आहे.

* ‘‘वादग्रस्त वर्तनानंतर फॉगनिनी दुहेरीचे दोन सामने खेळला. खरे तर त्याला तात्काळ स्पर्धेतून बाहेर काढायला हवे होते. तीन-चार दिवसांनी हा निर्णय घेणे अयोग्य आहे,’’ असे त्याने पुढे सांगितले.

जोकोव्हिचला कन्यारत्न

बेलग्रेड : ग्रँडस्लॅम विजेतेपदाला १२वेळा गवसणी घालणारा नोव्हाक जोकोव्हिच आणि त्याची पत्नी जेलीना यांना कन्यारत्न झाल्याचे वृत्त येथील स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे. शनिवारी सायंकाळी जेलिनाने दुसऱ्या अपत्याला जन्म दिला. तिचे नाव टारा असे जाहीर करण्यात आले. त्यांच्या दोन वर्षांच्या मोठय़ा मुलाचे नाव स्टीफन आहे. ३० वर्षीय जोकोव्हिच दुखापतीमुळे जुलैपासून स्पर्धात्मक टेनिसपासून दूर आहे. त्यामुळे कन्येच्या स्वागतासाठी तो मुबलक वेळ देऊ शकेल.