झुंजार नदाल!

३४ वर्षीय मिरजाना ल्युकिक-बारोनीचा सनसनाटी विजय सोमवारच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.

गेइल मॉनफिल्सला नमवत उपांत्यपूर्व फेरीत; सेरेना, जोहानाची सरशी

अचंबित करणाऱ्या ऊर्जेसह खेळणाऱ्या गेइल मॉनफिल्सचे खडतर आव्हान मोडून काढत राफेल नदालने झुंजार विजय साकारला. या विजयासह नदालने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. नदालच्या बरोबरीने मिलास राओनिक, डेव्हिड गॉफीन, ग्रिगोर दिमोत्रोव्ह यांनीही विजयी आगेकूच केली. महिलांमध्ये दिग्गज सेरेना विल्यम्ससह जोहाना कोन्ता, कॅरोलिन प्लिसकोव्हा यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ३४ वर्षीय मिरजाना ल्युकिक-बारोनीचा सनसनाटी विजय सोमवारच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.

२०१४ मध्ये शेवटचे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद नावावर करणाऱ्या नदालला मॉनफिल्सने कडवी टक्कर दिली. प्रचंड ऊर्जा आणि लवचीक शरीराच्या साह्य़ाने सर्वागीण वावर राखणारा मॉनफिल्स हे दुखापतीतून सावरून खेळणाऱ्या नदालसाठी अवघड समीकरण होते. मात्र चिवट झुंज देण्यासाठी प्रसिद्ध नदालने सातत्यपूर्ण खेळ करत बाजी मारली. नवव्या मानांकित नदालने ही लढत ६-३, ६-३, ४-६, ६-४,  अशी जिंकली. २००९ मध्ये नदालने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. नवव्यांदा नदालने या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला. २०१५ फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर पहिल्यांदाच नदालने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत एवढी मजल मारली.

तृतीय मानांकित राओनिकने रॉबटरे बॉटिस्टा ऑगटचा ७-६ (८-६), ३-६, ६-४, ६-१ असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पुढच्या फेरीत राओनिकसमोर १४ ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदे नावावर असलेल्या नदालचे खडतर आव्हान आहे. डेव्हिड गॉफीनने डॉमिनिका थिइमवर ५-७, ७-६ (७-४), ६-२, ६-२ अशी मात केली. १५व्या मानांकित दिमित्रोव्हने नोव्हाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का देणाऱ्या डेव्हिड इस्टोमिनवर २-६, ७-६ (७-२), ६-२, ६-१ असा विजय मिळवला. पायाच्या दुखापतीने सतावलेल्या इस्टोमिनला जोकोव्हिचविरुद्ध लढतीप्रमाणे प्रदर्शन करता आले नाही.

तब्बल १८ वर्षांनंतर मिरजाना ल्युकिक बारोनीने ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व किंवा त्यापुढच्या फेरीपर्यंत मजल मारण्याची किमया केली. तिने जेनिफर ब्रॅडीचा ६-४, ६-२ असा पराभव केला. २३व्या ग्रॅण्ड स्लॅम जेतेपदासाठी आतुर सेरेनाने बाबरेरा स्ट्रायकोव्हावर ७-५, ६-४ असा विजय मिळवला. नव्या वर्षांत भन्नाट सूर गवसलेल्या जोहाना कोन्ताने एकाटेरिना माकारोव्हावर ६-१, ६-४ अशी मात केली. पुढच्या फेरीत जोहानासमोर बलाढय़ सेरेनाचे आव्हान असणार आहे.

भारताचा अनुभवी शिलेदार लिएण्डर पेस आणि मार्टिना हिंगिस जोडीने ऑस्ट्रेलियाच्या मॅट रेड आणि सेक डेलाअ‍ॅक्वा जोडीवर ६-२, ६-३ असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rafael nadal reach quarterfinals of australian open