पॅरिस : ‘तो आला, तो खेळला आणि तोच जिंकला!’ स्पेनचा तारांकित टेनिसपटू राफेल नदालने लाल मातीच्या कोर्टवरील आपली मक्तेदारी पुन्हा एकदा सिद्ध करताना रविवारी तब्बल १४व्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. तसेच हे त्याचे वर्षांतील सलग दुसरे आणि एकूण विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात पाचव्या मानांकित नदालने नॉर्वेच्या कॅस्पर रूडवर ६-३, ६-३, ६-० अशी सरळ सेटमध्ये सरशी साधली. या सामन्यात एकेकाळी नदाल अकादमीमध्ये सराव केलेल्या रूडला फारशी झुंज देता आली नाही. नदालने आपल्या ३६व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनीच या जेतेपदावर कब्जा केला. त्यामुळे फ्रेंच स्पर्धा जिंकणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

हे ही वाचा >> खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंची नऊ सुवर्णपदकांची कमाई

नदालने २००५मध्ये वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यानंतर नदालच्या मक्तेदारीला शह देणे कोणत्याही खेळाडूला जमलेले नाही. १८ वर्षांच्या कालावधीत नदालने १४ वेळा ‘रोलँड गॅरॉस’च्या चषकावर आपले नाव कोरले आहे. तसेच यंदाची स्पर्धा जिंकल्यामुळे नदालने सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या शर्यतीतील आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे. त्याच्या नावावर आता २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे झाली असून दुसऱ्या स्थानावरील नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांनी प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

हे ही वाचा >> वेगळी तिची शैली! ;  नाशिकच्या माया सोनवणेचे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय

नदालला गेल्या काही वर्षांत विविध दुखापतींनी सतावले आहे. विशेषत: डाव्या पायाच्या दुखापतीमुळे त्याच्या यंदाच्या स्पर्धेतील सहभागावरही प्रश्नचिन्ह होते. मात्र, या दुखापतींना मागे सारत त्याने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आणि दर्जेदार प्रतिस्पर्ध्याना धूळ चारत जेतेपदाला गवसणी घातली. त्याने उपांत्यपूर्व फेरीत आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी जोकोव्हिचला शह दिला. त्यानंतर उपांत्य फेरीत अलेक्झांडर झ्वेरेव्हने अर्ध्यातून माघार घेतल्याने नदालने आगेकूच केली. मग अंतिम सामन्यात रूडला त्याने अगदी सहज पराभूत केले. या सामन्यात नदालने आठ वेळा रूडची सव्‍‌र्हिस मोडली. पहिल्या दोन सेटमध्ये रूडने काहीसा प्रतिकार केला; पण तिसऱ्या सेटमध्ये नदालने सफाईदार खेळ करताना रूडची सव्‍‌र्हिस सलग तीन वेळा मोडली.

मला भावना शब्दांत मांडणे अवघड जात आहे. वयाच्या ३६व्या वर्षी मी आणखी एका ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळेन आणि जिंकेन असे वाटले नव्हते. मात्र, मी खूप खुश आहे. भविष्यात काय होईल माहिती नाही; पण मी खेळत राहण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत राहीन.

– राफेल नदाल 

१४-० नदाल १४ वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला असून सर्व सामने जिंकले आहेत.

फ्रेंच खुली स्पर्धा जिंकणारा नदाल हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. 

२२ नदालने आतापर्यंत विक्रमी २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकाविली आहेत.

११२-३ नदालने फ्रेंच खुल्या स्पर्धेत ११५ पैकी ११२ सामने जिंकले असून केवळ तीन सामने गमावले आहेत.

पुरुष दुहेरीत अरेवालो-रोजेरची बाजी

मार्सेलो अरेवालो (एल साल्वाडोर) आणि जीन-ज्युलिअन रोजेर (नेदरलँड्स) या १२व्या मानांकित जोडीने फ्रेंच स्पर्धेतील पुरुष दुहेरी गटाचे जेतेपद मिळवले. त्यांनी अंतिम सामन्यात इव्हान डोडिग (क्रोएशिया) आणि ऑस्टिन क्राइसेक (अमेरिका) जोडीला ६-७ (४-७), ७-६ (७-५), ६-३ असे नमवले.

महिलांत गार्सिया-म्लादेनोव्हिच जोडी विजेती

कॅरोलिना गार्सिया आणि क्रिस्टिना म्लादेनोव्हिच या बिगरमानांकित जोडीने आठव्या मानांकित कोको गॉफ आणि जेसिका पेगुला या अमेरिकन जोडीला पराभवाचा धक्का देत फ्रेंच खुल्या स्पर्धेतील महिला दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात गार्सिया-म्लादेनोव्हिच या फ्रेंच जोडीने २-६, ६-३, ६-२ अशी बाजी मारली.