लंडन : स्पेनचा आघाडीचा टेनिसपटू राफेल नदालने यावर्षीच्या विम्बल्डन स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे. नदालच्या कारकीर्दीतले हे अखेरचे वर्ष मानले जात असून, आता यापुढे तो विम्बल्डनमध्ये कधीच दिसणार नाही हे स्पष्ट झाले. नदालने २००८ आणि २०१० मध्ये येथे विजेतेपद मिळविले आहे. समाजमाध्यमावरून नदालने आपण या स्पर्धेत खेळणार नसल्याचे जाहीर केले.

गेल्याच महिन्यात नदालला फ्रेंच टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पॅरिस ऑलिम्पिकवर लक्ष केंद्रित करण्यासाठी नदालने हा निर्णय घेतला असावा असे मानले जात आहे. नदाल ऑलिम्पिकमध्ये कार्लोस अल्कराझच्या साथीत दुहेरीची लढत खेळणार असून, एकेरीतही तो खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा >>> युरो फुटबॉल स्पर्धेचा थरार आजपासून; पहिल्या सामन्यात यजमान जर्मनीची गाठ स्कॉटलंडशी

‘‘फ्रेंच स्पर्धेदरम्यानच मला भविष्यातील सहभागाविषयी विचारण्यात आले होते. मी सध्या क्ले कोर्टवर सराव करत आहे आणि ऑलिम्पिक देखिल क्ले कोर्टवरच (लाल माती) होणार आहे. माझी ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असेल. शरीरही आता फारशी साथ करत नाही. त्यामुळे खेळत आहे तोवर आता क्ले कोर्टवर खेळणार आहे. त्यामुळे मी यावेळी विम्बल्डनमध्ये खेळू शकणार नाही,’’ असे नदाल म्हणाला.

‘‘विम्बल्डन येथील वातावरण, प्रेक्षक यांनी नेहमीच मला प्रोत्साहन दिले आहे. येथे खेळण्याचा आनंद वेगळाच असतो. मला असा निर्णय घेताना खूप दु:ख होत आहे,’’ असेही नदालने म्हटले आहे.