जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर पुन्हा आरूढ झाल्याचे राफेल नदालला कमालीचे आश्चर्य वाटत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये प्रथमच त्याला हा मान मिळत आहे.

नदाल हा जुलै २०१४ मध्ये अव्वल स्थानावर होता. त्यानंतर दुखापती व खराब कामगिरीमुळे त्याच्या क्रमवारीत घसरण झाली होती. नदालने यंदाच्या मोसमात फ्रेंच खुल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले. त्यामुळेच क्रमवारीत त्याने इंग्लंडच्या अ‍ॅण्डी मरेला मागे टाकून अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. मरेला मांडीतील दुखापतीमुळे माँट्रियल व सिनसिनाटी येथील स्पर्धामधून माघार घ्यावी लागली आहे. नदाल हा ऑगस्ट २००८ पासून १४१ आठवडे अव्वल स्थानावर होता. त्याने नुकत्याच झालेल्या सिनसिनाटी चषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती.

नदाल म्हणाला, ‘‘अव्वल स्थानावर पुन्हा झेप घेणे ही संस्मरणीय व प्रेरणादायक कामगिरी आहे. त्यामुळे यापुढेही जागतिक स्तरावरील स्पर्धामध्ये उत्तुंग यश मिळवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. मी ती निश्चितपणे पार पाडणार आहे.’’

नदाल व मरे यांच्यापाठोपाठ रॉजर फेडरर हा तिसऱ्या क्रमांकावर असून स्टॅनिस्लॉस वॉविरका हा चौथ्या क्रमांकावर आहेत. नोव्हाक जोकोव्हिच, अ‍ॅलेक्झांडर जेव्हेरेव्ह, मरिन सिलिक, डॉमिनिक थिएम, ग्रिगोर दिमित्रोव्ह व केई निशिकोरी हे अनुक्रमे पाच ते १० क्रमांकावर आहेत. सिनसिनाटी स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत नदालला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसने पाच स्थानांच्या सुधारणेसह १८व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

एटीपी कार्यकारी अध्यक्ष  ख्रिस केर्मोडे यांनी नदालचे अभिनंदन केले. ते म्हणाले,‘‘नऊ वर्षांनंतर पुन्हा अव्वल क्रमांक पटकावणे, हे अभूतपूर्व आहे. राफेल नदालने पुन्हा अव्वल क्रमांक पटकावत युवकांसमोर एक आदर्श ठेवला आहे.  ही त्याच्या अविस्वसनीय समर्पणाची प्रचिती आहे.  या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे अभिनंदन.’’