Raghu Sharma Maiden IPL Wicket Celebration Video: मुंबईचा ३३ वर्षीय खेळाडू रघु शर्माने लखनौविरूद्ध सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट मिळाली. अनेक वर्षे विविध संघाचा भाग असलेल्या रघु शर्माला अखेरीस मुंबई इंडियन्सकडून पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने विकेट घेत संधीचं सोनं केलं. रघु शर्माने पहिली विकेट मिळवल्यानंतर खिशातून पेपर काढत तो दाखवत विकेटचं सेलिब्रेशन केलं. यावर सूर्याच्या प्रतिक्रियेनेही सर्वांचं लक्ष वेधलं.
रघु शर्माला चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली. यानंतर त्याला सलग दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध सामन्यात प्लेईंग इलेव्हन संधी देण्यात आली. या सामन्यात संघाला गरज असताना त्याने नवोदित खेळाडू अक्षत रघुवंशीला बाद करत मुंबईसाठी महत्त्वाची कामगिरी केली. रघु शर्माने या विकेटनंतर खिशातून पेपर काढत सेलिब्रेशन केलं.
फिरकीपटू रघु शर्माला १३वं षटक टाकण्याची जबाबदारी दिली. १३व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षतची विकेट मिळवली. रघुचा चेंडू अक्षतच्या पॅडवर जाऊन आदळला आणि त्याच्या दिशेने आला त्याने लगेच झेल टिपला. यासह त्याने विकेटसाठी अपील केलं आणि पंचांनी अक्षतला बाद दिलं. आक्रमक अंदाजात रघुने विकेटचं सेलिब्रेशन केलं. यानंतर त्याने खिशातून नोट काढली आणि चाहत्यांना दाखवली.
रघु शर्माने नोट दाखवताच अगदी लहान मुलांप्रमाणे सूर्यकुमार यादव वाकून त्यावर काय लिहिलंय हे पाहत होता. सूर्यादादाची ही प्रतिक्रिया लगेच व्हायरल झाली. सूर्याशिवाय इतर सर्व खेळाडू रघुने काय लिहिलंय हे पाहण्यासाठी गोळा झाले. दीपक चहरने यानंतर रघुच्या हातातून नोट घेतली आणि त्यावर काय लिहिलं होतं, हे कॅमेराकडे दाखवलं.
रघु शर्माने विकेट सेलिब्रेशननंतर दाखवलेल्या पेपरवर काय लिहिलं होतं?
रघु शर्माने दाखवलेल्या या पेपरवर लिहिलं होतं की, “राधे राधे, आज देवाच्या कृपेने अतिशय वेदनादायक अशा १५ वर्षांची प्रतीक्षा संपली. ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे मनापासून आभार. जय श्री राम”
