अजिंक्य रहाणेच्या सध्याच्या कामगिरीचे मी किंवा कुणीही मूल्यांकन करण्यापेक्षा त्याला खंबीर पाठबळ देण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मत कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर व्यक्त केले.

‘‘रहाणेने भारताला अनेकदा कठीण स्थितीतून तारले आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीचे मीच काय, कुणीही मूल्यांकन करणे योग्य ठरणार नाही. या परिस्थितीवर कशी मात करायची, हे त्यालाच ज्ञात आहे. आपण फक्त त्याच्या पाठीशी राहायला हवे. टीका किंवा प्रशंसा यांसारख्या बाहेरील वातावरणाचा आमच्यावर कोणताच परिणाम होत नाही. तसेच त्यावर आधारित आम्ही निर्णयसुद्धा घेत नाही,’’ असे विश्लेषण कोहलीने रहाणेच्या कामगिरीवरील प्रश्नाला दिले. धावांसाठी झगडणाऱ्या रहाणेला दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आले. गेल्या २० कसोटी सामन्यांत रहाणेची धावसरासरी २० इतकी आहे. यावेळी कोहलीने मयांक, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

जागतिक स्पर्धा वगळता उत्तम वर्ष!

ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा वगळता भारतासाठी यंदाचे वर्ष उत्तम ठरले, अशी प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली. ‘‘भारतीय संघाने सर्व जिंकावे अशी अपेक्षा केली जाते. परंतु ती वास्तववादी नाही. आम्ही योग्य प्रक्रियेने याकडे पाहतो,’’ असे कोहली म्हणाला.

…ही डोकेदुखी उत्तम!

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेअंती दुसऱ्या फळीतील काही गुणी खेळाडू उदयास आले आहेत. दक्षिण आफ्रिकेची संघनिवड करतानाच्या आव्हानाबाबत विचारले असता ‘ही डोकेदुखी उत्तम’ अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. ‘‘संघरचनेच्या पर्यायांबाबत आम्ही निवड समितीशी चर्चा करू. आफ्रिकेत जाण्याआधी ही स्पष्टता होणे आवश्यक आहे,’’ असे कोहलीने सांगितले.

कठोर निर्णयाचे द्रविडचे संकेत

मुंबई : आगामी संघनिवड करताना काही कठोर निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावे लागू शकतात. परंतु ते घेताना खेळाडूंशी संवादाची नितांत आवश्यकता आहे, अशा शब्दांत भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने संकेत दिले आहेत.

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवड करताना अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचे स्थान धोक्यात आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत श्रेयस अय्यर, मयांक अगरवाल, अक्षर पटेल, जयंत यादव यांनी संधीचे सोने केले. सामन्यानंतर द्रविड म्हणाला, ‘‘युवा खेळाडू चांगली कामगिरी करीत असल्याने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. संघातील या स्पर्धेमुळे काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. मात्र ते घेताना स्पष्ट सुसंवादाची गरज असते. खेळाडूंना समस्या समजून सांगावी लागते.’’