दक्षिण कोरिया येथे झालेल्या आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेणारी कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत कोटय़धीश बनली आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राहीला महाराष्ट्र सरकारने एक कोटी रुपये देण्याची घोषणा गुरुवारी केली.
‘‘राही सरनोबत हिला एक कोटी रुपयांचे बक्षिस देऊन राज्य शासनाकडून गौरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तिला राज्य सरकारची ‘अ’ श्रेणीची नोकरी देण्याचा प्रस्तावही विचाराधीन आहे. राहीने महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची मान उंचावली आहे. राहीचा आम्हाला अभिमान असून तिच्या यशाने अनेक खेळाडू प्रेरणा घेतील, अशी आशा आहे,’’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.
क्रीडा मंत्री पद्माकर वळवी म्हणाले, ‘‘राही सरनोबत हिला १५ दिवसांच्या आत एक कोटी रुपये दिले जाणार आहेत.’’ २२ वर्षीय राहीने २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या किओनगे किम हिचा ८-६ असा पराभव करून सुवर्णपदकावर मोहोर उमटवली होती.

हा नेमबाजीचा गौरव – राही
मिलिंद ढमढेरे, पुणे</strong>
जागतिक सुवर्णपदक पटकावल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने मला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करून नेमबाजी या क्रीडा प्रकाराचा गौरव केला आहे, अशा शब्दांत ऑलिम्पिकपटू नेमबाज राही सरनोबतने आपल्या भावना व्यक्त केल्या.
नुकत्याच कोरियाला झालेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत राहीने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. कोल्हापूरच्या या नेमबाजाने २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पिस्तूल प्रकारात विश्वविजेतेपद मिळवणारी राही ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती. पाटण्यात मार्च २०१२मध्ये झालेल्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघातील सुवर्णा बारटक्के, दीपिका जोसेफ आणि अभिलाषा म्हात्रे या महाराष्ट्राच्या खेळाडूंना नुकतेच एक कोटी रुपयांचे इनाम देऊन गौरवले होते. त्याचप्रमाणे राहीला एक कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात यावी, अशी चर्चा क्रीडाचाहत्यांमध्ये होती. त्याला पूर्णविराम देत अखेर राज्य सरकारने राहीला एक कोटी रुपयांचे इनाम जाहीर केले.
एक कोटी रुपयांचे बक्षीस अपेक्षित होते का, असे विचारले असता राही म्हणाली, ‘‘मला एक कोटी रुपये द्यावेत, अशी मी मागणी केली नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी हे बक्षीस म्हणजे आश्चर्याचा धक्का देणारे ठरले आहे. मात्र हा धक्का सुखावह आहे. कारण नेमबाजी हा अतिशय खर्चिक क्रीडा प्रकार आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्यासाठी किमान सहा-सात वर्षे सतत नेमबाजीचा सराव करावा लागतो आणि त्याकरिता भरपूर साहित्याची आवश्यकता असते. हे साहित्य इंग्लंडमधून आयात करावे लागते आणि तेथेच जावून त्याची तपासणी करावी लागते. याकरिता लागणारा पैसा आता राज्य शासनाच्या पारितोषिकामुळे मला उपलब्ध होणार आहे. मला मिळालेल्या पारितोषिकांमुळे नेमबाजीत कारकीर्द करणाऱ्या नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल.’’
‘‘रिओ जी जानेरो येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सज्ज होण्याकरिता सर्वात महत्त्वाची अडचण असते ती म्हणजे पैशांची. या पुरस्कारामुळे ही अडचण आता दूर होणार आहे. ऑलिम्पिकपूर्वीच्या पात्रता स्पर्धाना पुढील वर्षी सुरुवात होणार असली तरी त्याकरिता भरपूर सराव करण्याची आवश्यकता असते. हा सराव प्रामुख्याने जर्मनी आणि अन्य युरोपियन देशांमध्ये करावा लागतो. किमान सात-आठ महिने तेथे सराव केला तर अनुभवात परिपक्वता येते. म्हणूनच मी जर्मनीत सरावासाठी जाणार आहे,’’ असेही राहीने सांगितले. ‘‘आजपर्यंत मिळविलेल्या यशामध्ये ‘गन फॉर ग्लोरी’मधील अनातोली पिद्दुबिनी हे परदेशी प्रशिक्षक, अकादमीचे संस्थापक व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते गगन नारंग तसेच त्यांचे सहकारी प्रशिक्षक यांचा महत्त्वाचा वाटा आहे,’’ असे राही हिने आवर्जून सांगितले.