भारताची नेमबाज राही सरनोबत हिने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक मिळवून शुक्रवारी इतिहास घडविला. शॅंगवन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत कोल्हापूरची कन्या असलेल्या राहीने २५ मीटर प्रकारात केऑंग किंमचा अंतिम सामन्यात ८-६ ने पराभव केला. 
आतापर्यंत अंजली भागवत, गगन नारंग, संजीव राजपूत, राजवर्धन राठोड, रंजन सोधी आणि मानवजित सिंग संधू यांनी आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आता राहीदेखील या भारतीय क्रीडापटूंच्या रांगेत जाऊन बसली आहे.
स्वप्न साकारणे म्हणजे काय हे मी अनुभवले असल्याची प्रतिक्रिया या विजयानंतर राहीने व्यक्त केली. ती म्हणाले, प्रशिक्षक अंतोली पुद्दूनी यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या काही महिन्यांपासून सराव करीत होते. त्याचेच फळ आज मला मिळाले. प्रशिक्षकांबरोबरच मी लक्ष्य आणि व्हॅस्कॉन या दोघांचेही तितकेच आभार मानते. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकले.
राहीने याअगोदर २०११मध्ये आयएसएसएफ विश्वकरंडक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.