विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : राहीचा सुवर्णवेध!

पात्रता फेरीत राहीने रॅपिड प्रकारात २९६ तर प्रेसिशन प्रकारात २९५ गुण मिळवले होते.

कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत

ओसिजेक : ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली कोल्हापूरची नेमबाज राही सरनोबत हिने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र याच गटात युवा नेमबाज मनू भाकर हिला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

राहीमार्फत भारताने या स्पर्धेत पहिल्या सुवर्णपदकाची नोंद केली. भारताने याआधी एक रौप्य आणि दोन कांस्यपदके मिळवली आहेत. ३० वर्षीय राहीने पात्रता फेरीत ५९१ गुणांसह दुसरे स्थान पटकावल्यानंतर अंतिम फेरीत ३९ गुण मिळवत पहिला क्रमांक प्राप्त केला. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मालिकेत राहीने अप्रतिम कामगिरी करत गुणांची लयलूट केली. फ्रान्सच्या माथिल्डे लॅमोल हिने अंतिम फेरीत ३१ गुण मिळवत रौप्यपदक जिंकले.

पात्रता फेरीत राहीने रॅपिड प्रकारात २९६ तर प्रेसिशन प्रकारात २९५ गुण मिळवले होते. मनू भाकर हिने पात्रता फेरीत ५८८ गुण मिळवूनही तिला अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करता आली नाही. बल्गेरियाच्या विक्टोरिया चायकाविरुद्धच्या शूट-ऑफ फेरीत ११ गुण मिळवल्याने भाकरला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

भाकरने सौरभ चौधरी याच्या साथीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकाराच्या मिश्र सांघिक गटात रौप्यपदक मिळवले. याआधी तिने राही आणि यशस्विनी देसवाल यांच्यासह महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र सांघिक कांस्यपदक पटकावले. याआधी सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात वैयक्तिक कांस्यपदक मिळवून दिले होते. टोक्यो ऑलिम्पिकआधी ही शेवटची स्पर्धा असून त्यानंतर भारतीय नेमबाज थेट टोक्योला रवाना होणार आहेत.

सुवर्णपदक निश्चित केल्यानंतर अखेरच्या फेऱ्यांमध्ये मी माझ्या तांत्रिक खेळावर अधिक भर दिला. अनेक नवीन गोष्टी प्रयोगात आणल्या. या स्पर्धेत पदक मिळवणे माझे ध्येय नव्हते तर टोक्यो ऑलिम्पिकआधी नवनवीन गोष्टींची उजळणी करणे महत्त्वाचे होते. या सुवर्णपदकामुळे माझी वाटचाल योग्य दिशेने होत आहे, हे स्पष्ट झाले. आता ऑलिम्पिकनंतरही या नवनवीन गोष्टींचा अवलंब करण्याचा माझा प्रयत्न असेल.

– राही सरनोबत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahi sarnobat grabs gold at issf shooting world cup zws