Rahmanullah Gurbaz Century: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आधी पावसाच्या सरी बरसल्या. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानकडून सलामीला आलेल्या रहमानुल्लाह गुरबाजने ५१ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ८ चौकारांच्या साहाय्याने दमदार शतक झळकावलं आहे.
हा सामना ठरलेल्या वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होणार होता. पण पावसाने हजेरी लावल्याने सामना सुरू होण्यास उशीर झाला. पाऊस थांबल्यानंतर ५:३० वाजता सामन्याला सुरुवात झाली. भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. अफागाणिस्तानकडून रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम जादरानची जोडी मैदानावर आली. अफगाणिस्तानला सुरुवातीला ३ मोठे धक्के बसले होते. पण रहमानुल्लाह गुरबाजने एक बाजू धरून ठेवली.
पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रहमानुल्लाह गुरबाजची फटकेबाजी पाहायला मिळाली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करत हे शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार खेचले. हे अफगाणिस्तानसाठी वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.
अफगाणिस्तानचा डाव १९४ धावांवर आटोपला
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. अफगाणिस्तानल सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले. इब्राहिम जादरान १, सेदिकुल्लाह अटल ० आणि रहमत शाह अवघ्या ३ धावा करुन माघारी परतले. त्यानंतर रहमानुल्लाह गुरबाजने १०२ धावांची शतकी खेळी करून अफगाणिस्तानचा डाव सावरला. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने २७ धावांची खेळी केली. तर अजमतुल्लाह ओमरजईने २६ धावांचे योगदान दिले. अफगाणिस्तानचा संपूर्ण डाव २४.५ षटकात १९४ धावांवर आटोपला.
भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, पहिलाच सामना खेळत असलेल्या गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांनी दमदार गोलंदाजी केली. यादरम्यान दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले.
