Rahmat Shah Record: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये एकमात्र कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. हा सामनात न्यू चंदीगडमध्ये सुरु आहे. सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८ गडी बाद ५६४ धावा करून डाव घोषित केला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि अफगाणिस्तानचा डाव अवघ्या १५२ धावांवर संपुष्टात आणला. अफगाणिस्तानचे सर्वच फलंदाज फ्लॉप ठरले. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रहमत शाहने एकाकी झुंज देत ६० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने भारताविरूद्ध खेळताना मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

भारतीय गोलंदाजांचा सामना करताना अफगाणिस्तानच्या फलंदाजांची पळता भुई थोडी झाली. मानव सुधारने पदार्पणात ६ गडी बाद केले. त्याच्या गोलंदाजीसमोर अफगाणिस्तानच्या फलंदाजांचा काही निभाव लागला नाही. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रहमत शाहने एक बाजू धरुन ठेवत एकाकी झुंज दिली. त्याने १३६ चेंडूंचा सामना करता ९ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ६० धावांची खेळी केली. या खेळीसह तो कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानकडून खेळताना भारताविरूद्ध अर्धशतकी खेळी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी अफगाणिस्तानच्या कुठल्याही फलंदाजाला भारताविरूद्ध खेळताना अर्धशतकी खेळी करता आली नव्हती. यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. तो अफगाणिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने १२७ षटकात ८ गडी बाद ५६४ धावा करुन डाव घोषित केला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने २४ धावा केल्या. तर केएल राहुलने १०० धावांची खेळी केली. तर साई सुदर्शनकडेही शतक झळकावण्याची संधी होती. तो ८१ धावा करुन माघारी परतला. तर कर्णधार शुबमन गिलने १२६ धावांची खेळी केली. ऋषभ पंतने ८१ धावा केल्या. तर ध्रुव जुरेलने १९ धावा केल्या. तर शेवटी वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ५२ धावांची खेळी केली.

मानव सुथारने घडवला इतिहास

फलंदाजांनी आपली भूमिका यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर, गोलंदाजांनीही पूर्ण जोर लावला. भारतीय संघाकडून पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या मानव सुथारने २२ षटकात अवघ्या ३३ धावा खर्च करुन सर्वाधिक ६ गडी बाद केले. यासह तो भारतीय संघाकडून कसोटी पदार्पणात ५ गडी बाद करणारा दहावा गोलंदाज ठरला आहे. यासह सातवा फिरकी गोलंदाज ठरला आहे.