नवी दिल्ली : राहुल द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक होणे, हे सर्वाधिक आनंददायी असून तो स्वत:ची कार्यपद्धती आणि नीतिमूल्यांच्या बळावर भारताला सर्वोच्च शिखरावर नेईल, अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी द्रविडची नेमणुकीविषयी घोषणा केली. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेन्टी-२० विश्वाचषकानंतर संपुष्टात येणार असून १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेद्वारे ४८ वर्षीय द्रविड प्रशिक्षकपदाची सूत्रे सांभाळणार आहे.

‘‘भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल आहे. द्रविडचा अनुभव संघातील युवा खेळाडूंसाठी अत्यंत लाभदायक ठरणार असून त्याची कार्यपद्धती इतरांपेक्षा भिन्न आहे. ट्वेन्टी-२० विश्वाचषकातील उर्वरित दोन लढतींमधील भारतीय खेळाडूंची कामगिरी पाहून तो योग्य ती योजना आखू शकतो. त्यामुळे एकंदरच द्रविडची नेमणूक भारतासाठी फलदायी ठरेल, यात शंका नाही,’’ असे गावस्कर म्हणाले.