Rahul Dravid Franchise Owner: सध्याच्या घडीला सगळीकडे फ्रँचायझी लीगचं प्रस्थ आहे. जगभरात बऱ्याच ठिकाणी या टी-२० लीग खेळल्या जातात. याच पार्श्वभूमीवर युरोपमध्ये एक नवीन लीग सुरू होणार असून, त्यात भारतीय क्रिकेटच्या महान दिग्गजांपैकी एक असलेल्या राहुल द्रविड यांचा संघ असेल. भारताचे माजी कर्णधार, प्रशिक्षक आणि महान फलंदाज राहुल द्रविड या लीगमध्ये संघाचे मालक म्हणून दिसणार आहेत.
युरोपियन टी२० प्रीमियर लीग फ्रँचायझी ‘डब्लिन गार्डियन्स’चा मालक म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली आहे. युरोपियन टी-२० प्रीमियर लीगने (ETPL) ११ मे रोजी द्रविड यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यासह, २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या या नवीन लीगसाठीच्या सर्व सहा फ्रँचायझींची रचना पूर्ण झाली आहे. डब्लिनमध्ये आयोजित एका भव्य समारंभात राहुल द्रविड यांना डब्लिन फ्रँचायझीचा मालक म्हणून घोषित करण्यात आलं.
या कार्यक्रमाला क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक प्रमुख व्यक्तींची उपस्थिती लाभली. ईटीपीएलचे सह-संस्थापक अभिषेक बच्चन यांच्यासह ख्रिस गेल, जॉन्टी ऱ्होड्स, ग्लेन मॅक्सवेल आणि फॅफ डु प्लेसिस यांसारखे दिग्गजही या लीगशी संबंधित आहेत.
आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, “ईटीपीएलमागील दूरदृष्टीने मला आकर्षित केलं. मला विश्वास आहे की, ही लीग केवळ युरोपमध्ये क्रिकेटला एक नवीन ओळख देणार नाही, तर तरुण खेळाडूंना प्रगती करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठही उपलब्ध करून देईल. डब्लिनमध्ये क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि विकासाची प्रचंड क्षमता आहे.”
द्रविड पुढे म्हणाले, “पुढच्या पिढीला घडवणं हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं राहिलं आहे आणि या प्रवासात ईटीपीएल महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, असा मला विश्वास आहे.” अभिषेक बच्चन म्हणाला की, राहुल द्रविडसारखे दिग्गज खेळाडू लीगमध्ये सामील होणं हे ईटीपीएलसाठी अत्यंत विशेष बाब आहे. त्यांनी युरोपमध्ये क्रिकेटचा विस्तार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हटलं.
ईटीपीएल लीग क्रिकेट आयर्लंड, क्रिकेट स्कॉटलंड आणि रॉयल डच क्रिकेट असोसिएशन यांच्या सहकार्याने सुरू केली जात आहे. युरोपमधील या पहिल्या आयसीसी-मान्यताप्राप्त बहु-देशीय फ्रँचायझी टी-२० लीगमध्ये डब्लिन, बेलफास्ट, एडिनबर्ग, ग्लासगो, रॉटरडॅम आणि अॅमस्टरडॅम येथील संघांचा समावेश असेल. या लीगमध्ये मिचेल मार्श, टिम डेव्हिड, मिचेल सँटनर, लियाम लिव्हिंगस्टोन, ग्लेन मॅक्सवेल, हेनरिक क्लासेन आणि फॅफ डु प्लेसिस यांच्यासह जगातील अनेक मोठे क्रिकेटपटू सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
सर्व सहा ईटीपीएल फ्रँचायझी आणि त्यांचे मालक
डब्लिन फ्रँचायझी – राहुल द्रविड
बेलफास्ट फ्रँचायझी – ग्लेन मॅक्सवेल आणि रोहन
एडिनबर्ग फ्रँचायझी – काईल मिल्स, नॅथन मॅककुलम आणि रॅशेल वाईजमन
ग्लासगो फ्रँचायझी – विपुल अग्रवाल आणि ख्रिस गेल
ॲमस्टरडॅम फ्रँचायझी – स्टीव्ह वॉ, जेमी ड्वायर आणि टिम थॉमस
रॉटरडॅम फ्रँचायझी – जॉन्टी ऱ्होड्स, फॅफ डू प्लेसिस, ग्लाशीन आणि समीर शाह, व्यवस्थापकीय भागीदार म्हणून मधुकर श्री
