कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने (KSCA) एम. चिन्नास्वामी स्टेडियममधील दोन स्टँडना भारताचे दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड व अनिल कुंबळे यांची नावं दिलं आहेत. तर महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांचं देखील नाव देण्यात आलं आहे. भारताचं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या तिघांनी आपल्या शानदार कारकिर्दीत देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाकडून खेळताना याच मैदानावर अनेक सामने गाजवले होते. स्टँन्डसच्या ओपनिंग सोहळ्यासाठी हे तिघेही उपस्थित होते.
अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. राहुल द्रविड या कार्यक्रमादरम्यान बोलताना भावुक झालेलं पाहायला मिळालं. राहुल द्रविडने यादरम्यान त्याच्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा देताना दिसला. ज्याचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
द्रविड समारंभात बोलताना म्हणाला, “हा सन्मान माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या वडिलांना क्रिकेटची प्रचंड आवड होती आणि त्यांनीच माझ्या मनात या खेळाबद्दल प्रेम निर्माण केलं. ते मला इथे अनेक सामने पाहायला आणायचे. केवळ कसोटी सामनेच नव्हे, तर रणजी ट्रॉफीचे सामनेही आम्ही एकत्र पाहायचो.”
द्रविडने पुढे म्हणाले, “आज शांता रंगास्वामींसारख्या व्यक्तीसोबत गौरव होत असल्याचा मला विशेष आनंद आहे. त्यांनी महिला क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे. आज सर्व क्षेत्रांतील महिला क्रीडाक्षेत्राची झालेली प्रगती पाहता, त्याचे मोठे श्रेय शांता रंगास्वामींसारख्या अग्रणी खेळाडूंना जाते. कारण त्यांनी त्या काळात क्रिकेट खेळलं, जेव्हा या देशात महिलांसाठी खेळणं आणि विशेषतः क्रिकेट खेळणं खूप कठीण होतं.”
द्रविड म्हणाले, “हे मैदान माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखं राहिलं आहे. अनिलने सांगितल्याप्रमाणे, कदाचित आम्ही आमच्या घरापेक्षा इथेच जास्त वेळ घालवला आहे. इथे मला अपार आनंदाचे क्षण मिळाले, कधी काही मोठ्या निराशाही अनुभवल्या; पण या ठिकाणाने मी आज आहे ते घडवलं आहे. KSCA आणि या महान, ऐतिहासिक मैदानाने मला आयुष्यात जे काही दिलं आहे, त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.”
अनिल कुंबळे हे भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज आहेत, तर राहुल द्रविड हे कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा करणारे दुसऱ्या क्रमांकाचे फलंदाज आहेत. शांता रंगास्वामी या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार होत्या आणि त्यांनी १९७६ ते १९८४ दरम्यान कसोटी संघाचे नेतृत्व केलं.
कुंबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं, “आमच्या सर्वांच्या योगदानामुळे कर्नाटक क्रिकेट आज ज्या उंचीवर आहे, ते गाठू शकले आहे; आणि तितकंच खरं म्हणजे कर्नाटक क्रिकेटमुळेच आम्ही घडलो. कोणत्या स्टँडला कोणाचे नाव दिले, हा मुद्दा नाही. आमच्या योगदानाची दखल घेऊन या स्टेडियममध्ये कायमस्वरूपी आमचं नाव कोरलं गेलं, हीच खरी विशेष बाब आहे.”
अनिल कुंबळे यांनीही आनंद व्यक्त करत सांगितलं की, राहुल द्रविड आणि माजी भारतीय महिला संघाच्या कर्णधार शांता रंगास्वामी यांच्याही नावाने स्टँडला नाव देण्यात आलं, ही अभिमानाची बाब आहे. कुंबळे म्हणाले, “माझा सहकारी राहुल द्रविड आणि शांता रंगास्वामी यांना कर्नाटक तसेच भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या मोठ्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येत आहे, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.”
“आपल्या अनेक दिग्गजांच्या नावाने स्टँड उभे राहिल्याचे पाहणे अतिशय आनंददायी आहे. त्यापैकी काहींसोबत खेळण्याचा मला सन्मान मिळाला, तर काहींनी KSCA मध्ये आमच्यासाठी आदर्श निर्माण केला आणि दिशा दाखवली. हे दृश्य खरोखरच विशेष आहे,” असं अनिल कुंबळे म्हणाले.

