द्रविडकडून अर्जाची औपचारिकता पूर्ण!

गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अनुक्रमे पारस म्हांब्रे आणि अजय रात्रा या माजी क्रिकेटपटूंनी अर्ज केले आहेत.

नवी दिल्ली : माजी कर्णधार राहुल द्रविडची भारतीय पुरुष क्रिकेट संघांच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड जवळपास निश्चित असून त्याने या पदासाठी अर्ज करण्यासाठीची औपचारिकता मंगळवारी पूर्ण केली. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी अनुक्रमे पारस म्हांब्रे आणि अजय रात्रा या माजी क्रिकेटपटूंनी अर्ज केले आहेत.

बेंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख द्रविडने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) क्रिकेट सल्लागार समितीचे काम सोपे झाले आहे. द्रविडने प्रशिक्षकपद सांभाळावे अशी ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचीही इच्छा आहे. अन्य कोणत्याही नामांकित व्यक्तीने या पदासाठी अर्ज केलेला नाही. ‘‘आज (२६ ऑक्टोबर) प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख होती आणि द्रविडने आपला अर्ज दाखल केला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वीच दुबई येथे झालेल्या ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यादरम्यान गांगुली व शाह यांनी द्रविडची भेट घेत प्रशिक्षकपद स्वीकारण्यासाठी त्याचे मन वळवले.

लक्ष्मण एनसीएचा मुख्य? भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस लक्ष्मण ‘एनसीए’च्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहे. तो ‘आयपीएल’मधील संघ सनरायजर्स हैदराबादचा प्रेरक म्हणून कार्यरत असून हे पद सोडण्याची त्याची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याने अध्यक्षपदासाठी नकार दिल्यास ‘बीसीसीआय’ माजी कर्णधार अनिल कुंबळेचा विचार करत असल्याचे समजते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rahul dravid formally applies for india head coach s post zws

ताज्या बातम्या