अति आक्रमक पद्धतीने टेस्ट मॅच खेळण्याची पद्धतच बदलून टाकणारे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांची नुकतीच इंग्लंडच्या प्रशिक्षकपदावरून गच्छंती करण्यात आली. मॅक्युलम यांच्या टोपणनावाने प्रसिद्ध झालेल्या बॅझबॉल प्रणालीवर उतारा म्हणून राहुल द्रविड यांची संयमी शैली उतारा ठरणार का? कारण इंग्लंडच्या टेस्ट प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड यांचं नाव चर्चेत आहे.
भारतीय संघाचे आधारस्तंभ राहिलेल्या द्रविड यांनी निवृत्तीनंतर बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुखपद भूषवलं. भारतीय अ संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. आयपीएलमधल्या राजस्थान रॉयल्स संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं. यानंतर द्रविड यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची अवघड जबाबदारी हाताळली. द्रविड यांच्या कार्यकाळात २०२४ मध्ये भारतीय संघाने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला.
मॅक्युलम यांना टेस्टचे प्रशिक्षक म्हणून डच्चू देण्यात असला तरी वनडे आणि टी२० संघाचे प्रशिक्षकपदी मॅक्युलमच असणार आहेत. दरम्यान इंग्लंडच्या टेस्ट प्रशिक्षकपदासाठी राहुल द्रविड यांच्यासह इंग्लंड संघाचे माजी प्रशिक्षक अँडी फ्लॉवर आणि माजी फिरकीपटू रिचर्ड डॉसन यांची नावंही चर्चेत आहेत.
डेली टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार द्रविड यांना पूर्ण वेळाची जबाबदारी नको आहे. पण टेस्ट संघाचं प्रशिक्षकपद असल्याने त्यांना वेळ मिळू शकतो. टेस्ट मॅचचं आयोजन सातत्याने होत नाही जेणेकरून द्रविड यांना कुटुंबीयांना वेळ देता येईल. तंत्रशुद्ध फलंदाजीचा वस्तुपाठ असलेले द्रविड इंग्लंड संघाचे प्रशिक्षक झाल्यास खेळाडूंना प्रचंड उपयोगी ठरू शकतं.
फ्लॉवर यांच्या प्रशिक्षक काळात इंग्लंडने तीनदा अॅशेस मालिकेवर कब्जा केला. त्याच कालावधीत इंग्लंडने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. डॉसन हे इंग्लंडमधल्या ग्लॅमॉर्गन काऊंटीचे प्रशिक्षक आहेत. तांत्रिक डावपेचात माहीर असं त्यांचं वर्णन केलं जातं. या तिघांव्यतिरिक्त श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा, अष्टपैलू अँड्यू फ्लिनटॉफ, पाकिस्तानचे माजी प्रशिक्षक माईक हेसन आणि ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टीन लँगर यांचा समावेश आहे.
२०२२ मध्ये मॅक्युलम यांनी इंग्लंडचं प्रशिक्षकपद स्वीकारलं. मॅक्युलम आणि बेन स्टोक्स या जोडगोळीने टेस्ट क्रिकेट खेळण्याची पद्धतच बदलली. ही पद्धत सुरुवातीला यशस्वी झाली. मात्र आव्हानात्मक खेळपट्ट्या आणि दर्जेदार प्रतिस्पर्धी यांच्यासमोर बॅझबॉल प्रणाली निष्प्रभ ठरली होती.
