माजी क्रिकेटपटू आणि भारताच्या युवा संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी प्रशिक्षकपदासाठी नव्या अर्जाची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

द्रविड सध्या भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे. ‘‘एनसीएच्या प्रशिक्षकपदासाठी पारदर्शक अर्ज प्रक्रियेचा अवलंब करण्यात येणार असून, यापुढे ‘बीसीसीआय’च्या कोणत्याही पदासाठी या पद्धतीचा अवलंब करणे अनिवार्य राहिल. युवा संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावत असल्यामुळे द्रविडला या पदासाठी प्रथम पसंती राहील,’’ असे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रशासकीय समितीसह (सीओए) झालेल्या बैठकीनंतर सांगितले. मुख्य प्रशिक्षकाकडे साहाय्यक प्रशिक्षकांची नवी फळी निवडण्याचेसुद्धा स्वातंत्र्य राहील, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.