भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड शांत स्वभावासाठी ओळखला जातो. आजपर्यंत द्रविड ही प्रतिमा कायम आहे. असं असलं तरी आयपीएल २०१४ स्पर्धेदरम्यान व्यक्त केलेल्या रागाबद्दल बरीच चर्चा रंगली होती. राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत होता. मात्र मुंबई इंडियन्सकडून शेवटच्या चेंडूवर मिळालेल्या पराभवानंतर द्रविडने राग व्यक्त करत टोपी जमिनीवर फेकली होती. आता या घटनेबाबत राहुल द्रविडने खुलासा केला आहे.

“माझ्या आयुष्यात मी नेहमीच आपल्या भावना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्यावर नेहमी दबाव असतो. आपल्यावर संपूर्ण देशाच्या नजरा खिळलेल्या असतात. अशा वेळी आपण जे काही करतो ते लोकं लक्षात ठेवतात. मैदान आणि बाहेरही लोकं तुमच्या प्रत्येक वागणुकीकडे लक्ष ठेवतात. टोपी फेकणं हे स्वाभाविकपणे झालं होतं. मला माहिती आहे मी जेव्हा शांत आणि तणावमुक्त असतो तेव्हा सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करतो. मात्र त्यावेळी मी शांत राहू शकलो नाही.” असं राहुल द्रविडने क्रेड अॅपच्या यूट्यूब चॅनेलशी बोलताना सांगितलं. “अशी घटना माझ्यासोबत पहिल्यांदा घडली असं नाही. असं कित्येक वेळा झालं आहे. फक्त पहिल्यांदा सार्वजनिकरित्या टीव्हीवर लोकांन पाहिलं.” असंही द्रविडने पुढे सांगितलं.

माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडला राग अनावर झाल्याने त्याने टोपी फेकली होती. तेव्हा त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला होता.

राहुल द्रविड त्याच्या कारकिर्दीत १६४ कसोटी, ३४४ एकदिवसी, एक टी २० आणि ८९ आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत राहुल द्रविडने एकूण १३,२८८ धावा केल्या आहेत. यात ३६ शतकं, २ द्विशतकं आणि ६३ अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यात १०,८८९ धावा केल्या असून यात १२ शतकं आणि ८३ अर्धशतकांचा समावेश आहे. राहुल द्रविड आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच टी २० सामना खेळला असून ३१ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये राहुल द्रविडने ८९ सामने खेळला असून १,८८२ धावा केल्या आहेत. त्यात एकूण ११ अर्धशतकं झळकावली आहेत.