भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी-२० मलिका ३-० ने खिशात टाकली आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर मालिकेता तिसरा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. भारताच्या १८५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला संघ १११ धावांवर सर्वबाद झाला. लॉकी फर्ग्युसन हा न्यूझीलंडकडून बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला. दीपक चहरने त्याला झेलबाद केले. झेल घेताच डगआऊटमध्ये बसलेला भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आनंदी झाला.

सामन्यानंतर द्रविडने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ”हा खरोखरच चांगला मालिका विजय होता. या मालिकेत प्रत्येकजण खूप छान खेळला. छान वाटत आहे, सुरुवात चांगली झाली आहे. आम्ही सुद्धा खूप वास्तववादी आहोत. आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील आणि या विजयाबद्दल थोडे वास्तववादी असले पाहिजे. टी-२० वर्ल्डकप फायनल खेळणे आणि नंतर लगेच इथे येऊन सहा दिवसांत तीन सामने खेळणे न्यूझीलंडसाठी सोपे नव्हते. आमच्या दृष्टीकोनातून छान आहे पण या मालिकेतून शिकून पुढे जायचे आहे. हा एक लांबचा प्रवास आहे आणि आमच्या वाट्याला चढ-उतार असतील. काही युवा खेळाडू येतात, हे पाहून खूप आनंद झाला. गेल्या काही महिन्यांपासून फारसे क्रिकेट न खेळलेल्या काही मुलांना आम्ही संधी दिली आहे. आमच्याकडे उपलब्ध असलेली काही कौशल्ये आम्ही पाहिली आहेत आणि जसजसे आम्ही पुढे जात आहोत तसतसे आम्हाला ती कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे.”

हेही वाचा – VIDEO : जैसे कर्म तैसे फळ..! पाकिस्तानच्या आफ्रिदीला ‘जबर’ दंड; रागाच्या भरात त्यानं…

सामन्यादरम्यान भारताच्या खेळाडूंनी चांगले क्षेत्ररक्षणही केले. न्यूझीलंडला कप्तान मिचेल सँटनर धावबाद झाला. इशान किशनने त्याला धावबाद केले. इशानची चपळता पाहून द्रविडने संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षण टी. दिलीप यांचे कौतुक केले.

न्यूझीलंडवर भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी, न्यूझीलंडवर भारताचा सर्वात मोठा विजय ५३ धावांचा होता. १ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्लीत झालेल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ५३ धावांनी पराभव केला होता.